पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेळेवर भाकरी सुद्धा करून घालीत नाही. हा प्रकार तरी काय आहे? ही बाई आहे तरी कशी ह्याचं मला फारच कुतूहल वाटायला लागलं. मी अण्णाला सांगितलं, "पोरीला एकदा माझ्याकडे घेऊन या. मी बोलते तिच्याशी."
 जना भेटायला आली आणि तिला पाहूनच अनेक गोष्टी स्वच्छ कळल्या. अंगानं थोराड पण शेलाट्या बांध्याची. काळा तुकतुकीत वर्ण, धरधरीत नाक, मोठाले डोळे, कपाळावर अधेली एवढं ठसठशीत कुंकू. बाई रसरशीत, देखणी होती. साधारण तिशीतली असेल.
 मी एकदम मुद्यालाच हात घातला. "भंडलकर म्हणतात त्यांना रोज उशीर होतो कारण तु भाकरी वेळेवर करीत नाहीस. असं का?"
 तिच्या डोळ्यांत अंगार फुलला पण उत्तर आलं नाही. सरळ हल्ला करून काही उपयोग नव्हता हे मला कळून चुकलं. मग मी तिला गप्पा मारीत हळूहळू बोलती केली. जे तिच्याकडून कळलं ते खरं म्हणजे आधीच ध्यानात यायला हरकत नव्हती. पण तिचा बाप आणि नवरा दोघंही ह्या गोष्टीचा उल्लेख टाळून खोटं बोलले होते. किंवा त्यांच्या लेखी त्याचं काही महत्त्व नव्हतं.
 >भंडलकर सरळसरळ आयुष्याच्या उतरणीला लागलेले म्हटल्यावर हे त्यांचं दुसरं लग्न होतं ह्यात काही आश्चर्य नव्हतं. थोडं आश्चर्य वाटलं ते ह्याचं की त्यांची पहिली बायको जिवंत होती. तिला मूल नाही म्हणून हे दुसरं लग्न केलं. सवतींचं एकमेकींशी मुळीच पटायचं नाही. थोरली मोठेपणाचा अधिकार गाजवून हिलाच सगळ्या कामाला जुंपायला पहायची. हिला मुलं झाल्यावर सुद्धा परिस्थितीत काही फरक पडला नाही. नवरा तिची समजूत घालायचा पण थोरलीला बोलण्याची त्याची हिम्मत नव्हती. मग ही सारखी माहेरी पळून यायची.
 आता ते इकडे रहायला आले होते पण आपल्यापेक्षा वयानं इतक्या मोठ्या असलेल्या एक संसार करून भागलेल्या त्या माणसाबरोबर जनाचे सूर कधी जुळलेच नाहीत. तिचं असमाधान ती नाठाळपणे वागून दाखवीत होती.
 "पण तुझ्या वडलांनी तुला अशी सवतीवर दिलीच कशी?"
 "त्येचं पयलं लगीन झालेलं माहीतच पडलं न्हवतं आमाला."
 "तरी पण वयानं एवढ्या मोठ्या माणसाबरोबर कसं लग्न लावून दिलं तुझं?"

 "आमच्या दाजींनी सुचवलं हुतं त्येंचं नाव. लई चांगला मानूस हाय,

॥अर्धुक॥
॥९६॥