पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर खायला घेतात. मग असे एकदम पैसे आले तरी ते थकलेली बिलं चुकवायला जातात."
 मी मनात म्हटलं,म्हणजे ही बाई काम तर करीत नाहीच, पण नवऱ्यानं मिळवलेले पैसे गैरहिशेबीपणानं उधळून टाकते. शेवटी मी एक दिवस म्हाताऱ्याला बोलावणं पाठवलं.
 "अण्णा, हा काय प्रकार आहे? तुम्ही पोरीला जरा खडसून सांगा. नाहीतर तुमच्या जावयाला कामावर ठेवणं कठीण होईल. जित्रापाचं काम आहे. सकाळी लोटायचं,खायला टाकायचं,धारा काढायच्या सगळं मलाच करावं लागतं. मग त्यांना ठेवलंय कशाला?"
 "बाई, आता तुमीच बगा आमी तकडं ऱ्हाया गेलो तर म्हातारीनं ह्यांची पोरं बी न्हेली. आता तिचं काय वय हाय का इक्त्या न्हान पोरांच्या मागं पळायचं? तर म्हंते त्येंची आय नीट संबळत न्हाई त्येना. तिच्यान होत न्हाई. मी पोरं परत न्हेऊन घातली तर पोरीनं दोन-चार दिसांनी पुन्ना आणून टाकली. म्हातारीनं अक्षी लाडावून ठेवलीया पोरीला. आन तिला काय म्हटलं तर डोळ्यांतनं पाणी काढते. म्हन्ते माजी येकलीच पोर उरलीया."

 त्याला तीन मुलं. थोरला मुलगा होता. तो बायकोला मारहाण करायचा. तिच्या भावानं त्याला वरच्यावर बजावलं होतं तिला मारलंस तर माझ्याशी गाठ आहे म्हणून. एक दिवस तिला इतकं मारलंन की तिचा भाऊ पिसाळलाच. ह्याच्या अंगावर रॉकेल ओतून ह्याला पेटवून दिलं. तो भाजून मेला. त्याच्या पाठची मुलगी. तिचं लग्न करून दिलं होतं. पहिलं बाळंतपण फार अवघड गेलं.तिला हृदयविकार आहे असं निदान केलं गेलं. डॉक्टरांनी अण्णाला समजावून सांगितलं की ती पुन्हा गर्भार राहिली तर बाळंतपणात मरून जाईल. पण सासरच्यांना मुलगा हवा होता. त्यांनी विचार केला असणार जगली वाचली आणि मुलगा झाला तर ठीकच. नाहीतर दुसरी बायको करता येईल. ती बाळंतपणात हृदयविकाराच्या झटक्याने मेली. ही जना सगळ्यात धाकटी. तिच्यासाठी काहीही केलं तरी अपुरंच आहे असं म्हातारीला का वाटत होतं ते एकवेळ समजू शकत होतं. पण जना आपल्या थकलेल्या आईचा असा फायदा का घेते, नवऱ्याशी इतक्या नाठाळपणे का वागते ह्याचं काही उत्तर मिळत नव्हतं. एक अडाणी अशिक्षित बाई. मजूर वर्गातली. घरातले सगळे कष्ट करणारे आणि ही सगळ्या तऱ्हेच्या कष्टांना नकार देणारी. शेतीचं काम करीत नाही. मुलांना संभाळत नाही, नवऱ्याला

॥अर्धुक॥
॥९५॥