पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण तो बरा झाला आणि सगळं पूर्वपदावर आलं. एक दिवस त्यानं सुमनला दिलेल्या शिव्या ऐकून थोरल्या मुलाचं डोकं फिरलं. त्यानं रॉकेलची बाटली घरातून आणून बापाच्या अंगावर रिकामी केली. म्हणाला. "थांब आता पेटवूनच देतो तुला, म्हणजे पुन्हा त्रास द्यायला यायचा नाहीस." व्यंकटला भीती वाटली तो खरंच आपल्याला पेटवून देणार म्हणून. तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी छकडा न्यायला आला तेव्हा मुलानं सांगितलं, "छकडा मिळणार नाही. बैल न छकडा आईनं आपल्या पैशानं घेतलाय. तिचा आहे तो." पण छकडा नसला तर पोटाला काय मिळवणार म्हणून सुमनने मधे पडून छकडा द्यायला लावला.
 व्यंकट आता काम नीट करीना. खाडे करायला लागला. दारू पिऊन कामावर आला म्हणून व्यापाऱ्याने त्याला हाकलून दिलं. तो पुन्हा छकड्याच्या लायनीत उभा रहायला लागला. पण भाडं सगळ्यांपेक्षा जादा सांगायचा, माल चढवा-उतरवायला मदत करायचा नाही, गिऱ्हाईकाशी अरेरावीनं वागायचा त्यामुळे त्याला फारसं काम मिळेना.

 सुमनचं आता चांगलं चाललं होतं.थोरला मुलगा गवंड्याच्या हाताखाली काम करायचा. त्याला चांगली हजेरी मिळायची. धाकट्याला एका औषधाच्या दुकानात नोकरी लागली. तिनं मुलीचं लग्न केलं. लग्नाला तिनं व्यंकटला बोलावलंच नव्हतं, पण तिचे भाऊ आणि शेजारीपाजारी असं कसं, मुलीच्या बापाशिवाय कसं लग्न लागायचं म्हणून त्याला घेऊन आले. त्याने प्रसंग साजरा केला, पण आपल्याला न विचारता सवरता पोरीचं लग्न केलं नि आपल्याला नुसतं पाहुण्यासारखं बोलावलं हे त्याला फार लागलं. लग्नानंतर थोड्या दिवसांनी तो दारू पिऊन आला आणि त्यानं मोठा तमाशा केला. सुमनला, पोरांना घाण घाण शिव्या दिल्या, घर माझ्या नावावर आहे तुम्हाला हाकलून काढीन म्हणून धमक्या दिल्या. घरासमोरच्या रस्त्यात छकडा आडवा घालून ठेवला होता न त्यामुळे सगळी रहदारी थांबली होती. काय प्रकार आहे पहायला माणसांची ही गर्दी जमली. पोरांनी बापाला मारहाण करीत घराबाहेर काढलं. तो अजून शिव्यागाळी करीत त्यांच्या अंगावर धावून जातच होता, पण जमलेल्या माणसांनी त्याची समजूत घालून त्याला मुकाट्याने जायला लावलं. सुमनला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. ती पोरांना म्हणाली, "मला आता हे सगळं सहन होत नाही. मी एकतर आत्महत्या करते नाहीतर आमच्या मालकांच्या रानातल्या वस्तीवर

॥अर्धुक॥
॥९१॥