पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिसत होती. ती बापाच्या अरे ला कारे करायला लागली. एक दिवस त्यांनी बापाला सुनावलं, "आईला शिव्या दिलेल्या आम्ही ऐकून घेणार नाही." तेव्हा तो सुमनला म्हणाला, "मी आता जातो तो परत यायचाच नाही. तू पाया पडलीस तरी येणार नाही. बघू तू एकटी घर कसं चालवतेस ते." तो छकडा जुंपून चालता झाला. त्याला कुणी थांब म्हटलं नाही. फक्त सुमनचा भाऊ तिला जाब विचारायला आला.
 "व्यंकटरावांना का हाकलून दिलं? ही काय रीत असते का?"
 "ते आपल्या पायांनी गेले."
 "ते तसं म्हणत नाहीत."
 "मग ते खोटं बोलतात. पोरांना इचार."
 "पोरं काय तुझ्या बाजूनंच बोलणार."
 ती उसळून म्हणाली, "का माज्या बाजूनं बोलतात? कारण त्यांना दिसतंय आपला बाप कसला हाय ते."
 "काय वाईट आहे त्यांच्यात?"
 "ते तुला दिसणारच नाई. तू आपल्या मतानं समजून उमजून मला त्यांच्या गळ्यात बांधलंयस."
 "सुमने, थोबाड फोडीन हां. लई चुरूचुरू बोलायला लागलीस."
 "फोड की, मार काई नवीन नाई मला. त्यो मारीतच होता, आता तूबी मार, समद्यांचा मार खायसाठीच जल्माला घातलीय मला."

 एक दिवस सुमनला कोणी तरी बोलवायला आलं व्यंकटला हॉस्पिटलला ॲडमिट केलंय म्हणून. माल छकड्यात भरत असताना एक फरशी त्याच्या पायावर पडून त्याची बोटं ठेचली होती आणि पावलाला फ्रॅक्चर झालं होतं. तिच्याच्यानं अगदीच झटकून टाकवलं नाही. त्याचं दुसरं कोणीच नाही हे तिला माहीत होतं आणि तिचा भाऊ बिऊ नुसता तोंडानं त्याचा कैवार घेणार, अडीअडचणीला त्याला मदत करणार नाही ह्याची तिला खात्री होती. ती हॉस्पिटलमधे गेली, त्याची देखभाल केली, कर्ज काढून हॉस्पिटलचं बिल भरलं आणि त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर घरी घेऊन आली. तो महिनाभर बसूनच होता. थोरला मुलगा फावल्या वेळात छकडा चालवून चार पैसे मिळवत होता. तरी पण पैशाची खूप ओढाताणच होती. जमेची बाजू एवढीच होती की व्यंकट जरा चांगला वागत होता. कदाचित तिनं त्याच्यासाठी एवढं केलं ह्याचं त्याला काहीतरी वाटलं असेल.

॥अर्धुक॥
॥९०॥