पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचवून पण दर्जाबद्दल तडजोड न करता निवडलं त्याचं व्यापाऱ्याला कौतुक वाटलं.
 व्यंकट वर्दीवरून आल्यावर त्यानं त्याला विचारलं घरी का जात नाही म्हणून.
 "तुमाला कुणी सांगितलं?"
 "तुमची बायको आली होती. असं बरं नाही. अहो, माणूस काम कशासाठी करतो? बायकापोरांसाठी ना? अन् तुम्ही घर, बायकापोरं असून इथं भणंगासारखे रहाता?"
 "ती चांगल्या चालीची बाई नाही सायेब?"
 "तसं काही नाही. मी चौकशी केलीय. कुणी काही वावगं बोलत नाही तिच्याबद्दल."
 व्यंकटची समजूत घालून व्यापाऱ्यानं त्याला घरी पाठवलं. तो आल्यावर सुमनवर डाफरला. "मालकाकडे जाऊन माझ्याबद्दल तक्रार करायला लाज वाटली नाही?"
 "मी तक्रार केली नाई. त्यांनीचहन इचारलं."
 "पण आधी तिकडं गेलीसच कशापाई?"
 "सामान घ्यायला."
 "सामान? कशाचं सामान?"
 "घराची डागडुजी करून घेणार हाय मी. छपार गळतया, कूड धड राह्यलं नाई, जमिनीला उंदरांनी उकर काढलाय. तुमाला लईदा म्हणलं पर तुमी मनावरच घेईनात मग आता मीच करायचं ठरवलं."
 "आन पैसे कोण देणार? बाप तुझा?"
 "मी देनार हाय. दर महिन्याला माज्या पगारातनं थोडं थोडं. तुमच्या मालकांनी हप्ते दिलेत मला."

 ती आपल्या पायावर उभी रहातेय, मला न विचारता आपल्याच कलानं सगळं करतेय हे व्यंकटला आवडलं नव्हतं. तो तिचा रागराग करायचा. रोज घरात शिव्यागाळी, भांडणं सुरू झाली. पैसे पण देईना. त्यात त्यानं दारू प्यायला सुरुवात केली. बैलाच्या खाण्याची सुद्धा हेळसांड करायला लागला. मग सुमनला पैसे देऊन पोरांकडून कुठे वैरणीची पेंढी, कुठे उसाचं वाडं आणून बैलापुढे टाकावं लागायचं. तिला वाटायला लागलं हा घरी येत नव्हता तेच बरं होतं. मुलं आता मोठी झाली होती. त्यांना ही सगळी परवड

॥अर्धुक॥
॥८९॥