Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिचं ऑपरेशन झाल्याचं कळलं तशी व्यंकट धावत शिबिरात गेला. "मला न सांगता आप्रेशन का केलंस? खून पाडीन तुझा." ती कार्यकर्ती कसला गोंधळ आहे म्हणून पहायला आली तर हा तिच्या अंगावर धावून गेला. "माझ्या परवानगीबिगार तिचं आप्रेशन कसं केलं? कोर्टात खेचीन तुम्हाला." तिनं त्याला सुनावलं, "ऑपरेशन करून घ्यायला नवऱ्याची परवानगी लागत नाही. तुम्ही मुकाट्यानं बाहेर व्हा नाहीतर माणसं बोलवून तुम्हाला बाहेर काढावं लागेल."
 त्याला आणखी मुलं हवी होती असं नाही. चांगले दोन मुलगे, एक मुलगी होती. पण बायकोनं आपल्याला न सांगता-विचारता असला निर्णय घेतला ह्याचा त्याला अपमान वाटला. समजते कोण स्वत:ला ही? मी नवरा आहे तिचा. आणि आता ती बिनबोभाट कुणाशीही संबंध ठेवू शकते ह्या विचाराने त्याच्या जिवाचा नुसता संताप झाला. तो तिला पुन्हा मारहाण करायला लागला आणि कुणाला सांगितलंस तर जिवे मारीन अशी धमकी देऊन ठेवली.
 त्याला एका व्यापाऱ्याकडे नोकरी लागली. तशी पगारी नोकरी नव्हती, पण नुसतं वखारीत थांबायचं आणि माल घेणाऱ्या गिऱ्हाइकाचा माल पोचवायचा. व्यापाऱ्याचा धंदा मोठा होता आणि व्यंकटला खूप काम मिळत होतं. त्यानं घरी जायचं सोडून दिलं. व्यापाऱ्याच्या सामानाच्या यार्डात छकडा सोडून तिथेच झोपायचा. व्यापारी खूष होता कारण त्याला फुकटात वॉचमन मिळत होता.
 एक दिवस सुमन वखारीत आली. ती आडोशाला थांबली आणि व्यंकट वर्दीवर गेल्याचं पाहून आत गेली. आपण कोण ते व्यापाऱ्याला सांगून ती म्हणाली, "घराची डागडुजी करायला सामान पाहिजेय. उधारीवर द्याल का? मी थोडं थोडं करून माझ्या पगारातनं पैसं फेडीन."
 "व्यंकटराव देतील की."
 "नको."
 "का?"
 "ते घरी येत नाईत. खर्चाला बी पैसे देत नाईत. ह्याचं बिल द्यायचे नाईत."
 "बरं बघू."

 तिनं पत्रे, फरशा, वासे असं सामान नीट पारखून शक्य तितके पैसे

॥अर्धुक॥
॥८८॥