पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कितीतरी जास्त. शिवाय तीन लहान मुलं असल्यामुळे घरचं काम काही थोडं नव्हतं. पुन्हा ही माणसं चांगली होती. अडीअडचणीला उचल, सणासुदीला कपडे, गोडधोड काय केलेलं असेल ते मिळायचं, पण व्यंकट तिला नीटपणे नोकरी करू देईल तर शपथ. तिच्या चालचलणुकीबद्दल संशय घेऊन मारहाण करायची, पगारातले तो मागेल तेवढे पैसे त्याच्या हातावर ठेवले नाहीत तरी मारहाण करायची, हा त्याचा खाक्या.
 त्या दिवशी मार पडल्यावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला गेली तेव्हा मालकिणीने काय झालं म्हणून विचारलं. मग तिच्या नवऱ्याला बोलावून घेऊन पुन्हा असं झालं तर पोलिसात वर्दी देईन अशी धमकी दिली. सुमन त्याला धमक्या द्यायचीच, पण तिच्यासारख्या नगण्य बाईच्या तक्रारीची पोलिस काही दखल घेणार नाहीत हे त्याला माहीत होतं. मात्र गावातली एक प्रतिष्ठित बाई तिला घेऊन पोलिस स्टेशनला गेली तर ते नक्की दखल घेतील हे तो जाणून होता. सुमन घरी आल्यावर तो चिडून म्हणाला, "आपल्या घरातली भांडणं त्यांच्यापर्यंत न्यायची काय गरज होती?" ती म्हणाली, "त्या आंधळ्याच हायती जणू. त्यांनी माझं तोंड बघून इचारलं. आन सांगितलं तर काय झालं? तुमी वाटेल तसं मारायचं न मी निस्तं तोंड बांधून ऐकून घ्यायचं व्हय?" तो रागाने जळत होता. पण तिच्या अंगाला हात लावायला धजला नाही.
 व्यंकट एकाचा छकडा चालवायचं काम करायचा पण काम नियमित नसे आणि पैसे फार मिळायचे नाहीत. सुमनच्या मालकिणीने धमकी दिल्यापासून तो जरा सरळ आला. खाडे कमी करायचा, घरखर्चाला पैसे आणून द्यायचा. सुमनने तिच्या मालकिणीकडून कर्ज काढून एक बैल आणि जुना छकडा विकत घेतला. व्यंकटला जास्त काम मिळायला लागलं. तुटपुंज्या पगाराऐवजी मालकीच्या छकड्याच्या भाड्याचे सगळे पैसे त्याला मिळत. बैलाचं खाणंपिणं भागून वर चांगली मिळकत व्हायला लागली. व्यंकट अजून अधूनमधून गांज्याच्या नशेत असायचा, पण सुमनला त्रास देत नव्हता. शेवटी आपल्याला बरे दिवस आले म्हणून ती हरखून गेली. पण ते तिच्या फार दिवस नशिबात नव्हतं.

 निमित्त झालं तिच्या ऑपरेशनचं. गावात बिनटाक्याच्या ऑपरेशनचं शिबीर होतं. सुमनच्या ओळखीची एक कार्यकर्ती होती तिनं सुमनला विचारलं तुला करून घ्यायचं का म्हणून. सुमन अगदी ठामपणे हो म्हणाली.

॥अर्धुक॥
॥८७॥