पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किती वाजता कामावरून निघतेस? इतका उशीर कसा होतो रोज रोज यायला? कुणाला भेटाय जातेस वाटेत? बोल."
 वाक्यागणिक तो तिला हाणीत होता.
 "बाईंना येऊन इचारा. हल्ली उशिरानंच सोडतात मला. मी नाई वं कुठं जात."
 सुमन थरथर कापत होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. मुलं भेदरून भोवती उभी होती. हे असं वरच्यावर चालायचंच पण आज मारण्याला अंत राहिला नाही. शेवटी शेजाऱ्यांनी मधे पडून तिला सोडवली. ती कोपऱ्यात कण्हत पडली. तिची पाठ वळांनी काळीनिळी झाली होती, तोंड सुजलं होतं. ह्या भोगातनं मेल्याशिवाय सुटका नाही अशी तिची खात्री झाली होती. आत्महत्या करायचा विचार मनात डोकवत होता, पण पोरांकडे बघून तो ती बाजूला सारीत होती. व्यंकट गुरगुरला, "ए, उठ. तिथं बसून काय राह्यलीस? भाकरी कुणी करायची? उठतेस का घालू लाथ?".
 पूर्णचंद्र चेहरा, मोठं कपाळ, टपोरे डोळे, लाडिक जिवणी, डोलदार बांधा. कुणीही वळून पहावं इतकी देखणी आणि तेच तिचं पाप ठरलं होतं.
 सुमनचा बाप तिच्या लहानपणीच वारला. दोन थोरले भाऊ, एक थोरली लग्न झालेली बहीण. ही लग्नाला आली तेव्हा विधवा आई थोरल्या मुलाकडे आश्रितासारखी रहात होती. त्यानं सुमनसाठी स्थळ आणलं ते नाकारायची हिंमत तिच्यात नव्हती आणि सुमनमधेही नव्हती. व्यंकट एक आगापिछा नसलेला, नियमित कामधंदा नसलेला गांजेकस माणूस. पण दिसायला बरा होता, वागायला मऊ, निदान त्यावेळी तरी. त्याच्या गोड हसण्यामागे असलं उफराटं काळीज दडलं असेल ह्याची तिला काय कल्पना? बरं, थोडीफार मारहाण करतो म्हटल्यावर त्यात कुणालाच काही वावगं वाटलं नाही. भावाला तर नाहीच नाही. त्याला तिचा भार झालेला म्हणून तर तिचं लग्न करून टाकलं. आता पुन्हा काहीही कारणानं तो तिला आसरा देईल ह्याची सुतराम शक्यता नव्हती. तिची बाळंतपणं त्यानं केली नाहीतच, पण तिला मदत म्हणून त्यावेळी आई तिच्याकडे जाऊन राहिली तर त्याने केवढी कटकट केली.

 मुलं जरा मोठी झाल्यावर सुमननं एका ठिकाणी स्वैपाकणीचं काम धरलं. दोन्ही वेळचा स्वैपाक करायचा. पगार बरा होता, कायम नोकरी. सतरा ठिकाणी भांडीधुणी करून पैसे जास्त मिळाले असते, पण त्यात कष्ट

॥अर्धुक॥
॥८६॥