पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला खूप आनंद झाला. तो तऱ्हेतऱ्हेने तिचे लाड करी. हळूहळू सुरुवातीची कटुता विसरून तीही संसारात, त्याच्या प्रेमात रमायला लागली. तिला मुलगा झाला आणि तिच्या आयुष्याला एकदम वेगळंच परिमाण लाभलं.आता तिचा दिवस कसा जायचा तिला कळतही नसे. एकदा रॉबर्ट म्हणाला, "बघ, माझंच बरोबर होतं की नाही? आता तू काम करता येत नाही म्हणून झुरत नाहीस ना? किती आनंदात असतेस!" तिला धक्का बसला. म्हणजे हीच ह्याची अपेक्षा होती. ती म्हणाली, "कितीही आनंदात असो. पण तीन वर्ष झाली की मी काम करण्याच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहे हे ध्यानात ठेव."
 "पण का? काय कमी आहे तुझ्या आयुष्यात?"
 "रॉबर्ट, मी मागे एकदा विचारला होता तोच प्रश्न तुला पुन्हा विचारते. समजा मी काम करून पैसे मिळवीत असते तर तुला घरी राहून बाळाला संभाळणं, स्वैपाक करणं एवढंच करून पूर्ण समाधान मिळेल?"
 "मुलांना जन्म देणं, त्यांना संभाळणं, घरकाम करणं हे बाईचं काम आहे."
 "असं कुणी ठरवलं?"
 "निसर्गाने, पुरुष मूल जन्माला घालू शकतो?"

 तिला कळून चुकलं की त्याच्या ह्या बाबतीतल्या कल्पना फार ठाम आहेत आणि त्या बदलणं फार अवघड होणार आहे. तिला अशीही भीती वाटायला लागली की आपल्याला काम करू द्यायचा त्याचा इरादाच नाही, कधीच नव्हता. कायदा काहीही असला तरी त्याची इच्छा आणि सहकार्य ह्यांशिवाय ती काम करू शकणार नव्हती. बरं,मायदेशी परत जाण्याबद्दलही तो काही वायदा करीत नव्हता. इथे भरपूर पैसे मिळतायत, तिकडे जाऊन बस्तान बसवायला वेळ लागणार.घाई काय आहे, आणखी थोडी वर्ष इकडेच काढू, असं तो म्हणे. ह्या कोंडीतून बाहेर पडायला एकच मार्ग होता, तो म्हणजे त्याला सोडून जायचं. पण आता एकटं परत जायचं म्हणजे मुलाचा प्रश्न होता. पुन्हा मुलावर त्याचा फार जीव होता. त्याला घेऊन तिला तो जाऊ देईल की नाही तिला शंकाच होती. बरं, मी परत जाते असं सांगितलं आणि तो एकदम बिथरला तर इथे परदेशात आपल्याला कुणाचा आधार नसताना काय होईल ह्याची भीती वाटत होती. समजा ती म्हणाली. मला जायचंय आणि त्यानं पैसे द्यायचं नाकारलं तर तीअडकून पडणारच, शिवाय

॥अर्धुक॥
॥८३॥