पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "तो प्रश्न नाहीये. आपण ह्या विषयावर जेव्हा जेव्हा बोललो किंवा लिहिलं तेव्हा मी इथे येऊन लगेच तुझ्याबरोबर काम करू शकेन असं तू भासवलंस."
 "मी काहीही भासवलं नाही. तू मला अगदी अशा शब्दांत स्पष्टपणे कधी विचारलं होतंस का? मी धरून चाललो होतो की लग्न झाल्या झाल्या काही दिवस घरी राहून संसार करायला तुला आवडेल. तू अगदी असं बोलत्येयस की तू फक्त डॉक्टरी करण्यासाठी इथे आलीस. मग नोकरी पहायची होतीस. लग्न कशाला केलंस?"
 "रॉबर्ट, मी संसार करायचा नाही असं म्हणतेय का? पण संसार चोवीस तास घरी बसूनच करावा लागतो का? तू लग्न झालं म्हणून काम सोडून नुसता घरी बसशील का? मग मी तसं करावं अशी अपेक्षा तू धरतोस?"
 "मी घरी बसलो तर खायचं काय?"
 तो मुद्दाम वेड पांघरीत होता तेव्हा तिनं तात्पुरता वाद सोडून दिला. पण काही कारण नसताना त्याने आपल्याशी प्रतारणा केली म्हणून ती खूप दुखावली गेली. त्याने असं का केलं ते मात्र तिला समजत नव्हतं. एखादी साधीसुधी घर-संसार ह्यातच सुख मानणारी बायको त्याला सहज मिळाली असती. मग तिच्या बुद्धिमत्तेची, व्यावसायिक यशाची तारीफ करीत मुद्दाम तिच्याशी त्यानं लग्न का केलं. कारणं दोनच असू शकत होती. एक म्हणजे त्याच्यात काहीतरी सहज न समजणारं व्यंग, उणेपणा होता. त्यामुळे त्याचं लग्न होत नव्हतं आणि तिच्यासारख्या प्रौढ अविवाहितेला त्यानं विनासायास जाळ्यात ओढलं होतं. दुसरं म्हणजे त्याला ती खरंच फार आवडली होती आणि खरं सांगितलं तर ती कदाचित त्याच्याशी लग्न करणार नाही अशी त्याला भीती वाटली. हे दुसरं कारण जरी खरं असलं तरी त्यामुळे तिचा अहंकार काही सुखावला नाही. त्याने केलेल्या फसवणुकीबद्दल तिच्या मनात अढी राहून गेली. तो मात्र, एकदा वादाचा मुद्दा तिनं तात्पुरता बाजूला सारल्यावर, तिच्याशी प्रेमानं वागत होता.

 दोघांसाठी घर चालवायला कितीसा वेळ लागणार? त्यातून दिवसभर आणि पुष्कळदा रात्री उशीरपर्यंत ती एकटीच असे. वाचन, बागकाम असं करूनही वेळ जाता जात नसे. मग तिनं मूल होऊ द्यायचं ठरवलं. काम करण्याची वेळ येईपर्यंत ते पुरेसं मोठं तरी होईल. तिला दिवस गेल्यावर

॥अर्धुक॥
॥८२॥