Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो चिडला तर नंतरचं सहजीवनही कलुषित होईल. तेव्हा सध्या तरी त्याच्या कलाने घेऊन आयुष्यक्रम सुरळीत चालू ठेवायचा, मग मुलगा थोडा मोठा झाल्यावर काय ती हालचाल करायची असं तिनं ठरवलं. दुसरं मूल मात्र होऊ द्यायचं नाही असा निर्णय तिनं रॉबर्टला न विचारताच घेऊन टाकला. समजा परत जायचं ठरवलंच तर पैशाची सोय होऊ शकेल का असं भावाला लिहून विचारायचं तिनं ठरवलं. एकदा हे निर्णय घेऊन टाकल्यावर तिच्या मनातलं वादळ तात्पुरतं शमलं. तसा नुसतं दु:ख करीत बसण्याचा तिचा स्वभाव नव्हता, तेव्हा एकदा संघर्ष लांबणीवर टाकायचं ठरवल्यावर ती समाधानाने रहायला लागली.
 त्या वर्षीचा पावसाळा आला तो सुरुवातीलाच अतिवृष्टी घेऊन. मार्गरेटने केरळातला धुवाधार पाऊस अनुभवलेला असल्यामुळे तिला ह्या देशातल्या पावसाचं काही वाटत नसे, तरी पण हा पावसाळा काहीतरी विलक्षणच वाटला. काळ्या ढगांचा जणू शेकडो फूट जाडीचा थर माथ्यावर घट्ट बसला होता नि दिवस न् दिवस पाऊस कोसळत होता तरी तो विरळ होतोय असं वाटेना. सतत घराभोवती लपेटलेला पाण्याचा पडदा ती भयचकित नजरेनं पहात होती. कुठे बाहेर जाणं, खरेदी, कुणाकडे जेवायला जाणं सगळं बंदच होतं. संध्याकाळी फक्त जरा काळजीतच रॉबर्टची वाट बघत बसायचं. पावसाच्या पाचव्या दिवशी दिवेलागणीच्या सुमाराला एकाएकी प्रचंड आवाज झाला. कॉलनीच्या पिछाडीच्या डोंगराचा एक भला थोरला लचका अलग होऊन कॉलनीतल्या अनेक घरांवर कोसळला. मार्गरेटचा भविष्यकाळ वीस फूट उंचीच्या चिखलाच्या ढिगाऱ्यात लुप्त झाला.

॥अर्धुक॥
॥८४॥