पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतिहास सांगितल्यावर ती आतून कुठेतरी खूप सुखावली. तिनं त्याला लिहिलं, "पण मधेच मी दुसऱ्या कुणाशी तरी लग्न केलं असतं म्हणजे?" "मी माझ्या हेरांकरवी तुझ्यावर नजर ठेवली होती ना." मग तिनं लिहिलं, "म्हणजे हे ठरवून झालेलं लग्नच झालं की. तू ठरवलेलं." त्याने उत्तर पाठवलं, "पण तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्यावर लादलेलं नव्हे."
 मार्गरेटच्या आईवडलांना तो फारसा पसंत नव्हता. त्याचं वय तिच्यापेक्षा बरंच जास्त होतं आणि त्याचं कुटुंब त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाचं होतं. तरी पण निदान तो त्यांच्या 'जाती'चा तरी होता.
 दीडेक वर्षाने तो हिंदुस्थानात परत येणार होता तेव्हा लग्न करायचं असं निश्चित झालं आणि दुर्दैवाने तो एकाएकी वारला. त्याच्या हृदयात एक क्वचितच आढळणारा दोष होता आणि हे कुणालाही माहीत नव्हतं. त्याला झटका येऊन हॉस्पिटलमधे नेलं तेव्हा नक्की काय झालं त्याचं निदान पुरेसं लवकर झालं नाही. झालं असतं तर तो कदाचित वाचला असता. मार्गरेटची प्रेमकथा सुरू होण्यापूर्वीच संपली. ह्या आघातातून सावरणं तिला कठीण गेलं. पण तिचा अभ्यास होता, काम होतं त्यात तिनं स्वत:ला शक्य तितकं गुंतवून घेतलं. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लिहून ठेवलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे कपडे, पुस्तकं, इतर थोडंफार सामान तिच्याकडे पाठवण्यात आलं. बरेच दिवस पार्सलं उघडून पहाण्याचंही धैर्य तिला झालं नाही. तिच्या हॉस्टेलमधल्या खोलीच्या कोपऱ्यात ती पडून होती. मग हळूहळू एकेक वस्तू बघत, हाताळत तिनं दु:खाला वाट करून दिली.
 ती एम्.डी. होऊन एका मोठ्या हॉस्पिटलमधे नोकरीला लागली. खाजगी प्रॅक्टिसपेक्षा तिला ते बरं वाटलं. कन्सल्टंट म्हणून कामाची सुरुवात करायला बरेच पैसे लागले असते ते तिच्याकडे नव्हते. नोकरी म्हणजे पगार लगेच सुरू होतो. शिवाय अगदी घाण्याला जुंपल्यासारख काम करावं लागत नाही. एकदा घरी आलं की वाचन वगैरे करायला वेळ मिळतो. असा सगळा विचार करून तिनं नोकरी करायचा निर्णय घेतला.

 तिच्या आईवडलांचा दबाव परत सुरू झाला. जन्मभर तू नुसती त्याच्या आठवणींवर का जगणार आहेस? जगायला काही आधार नको का? घरसंसार, मुलं-बाळं, नवरा ह्या सगळ्यांशिवाय तू एकटीनं आयुष्य कसं काढणार? मार्गरेटला लग्न करायचंच नव्हतं असं नाही. पण आपल्या इतक्या वयाच्या,स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या, आपल ज्ञान, कसब पणाला

॥अर्धुक॥
॥७९॥