लावून कामाचं आव्हान समर्थपणे पेलणाऱ्या बाईने बघून सवरून लग्न करायचं ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. अनेक डॉक्टर होणाऱ्या बायका अशा तऱ्हेने लग्न करतात आणि सुखाचे संसार करतात हे तिनं पाहिलं होतं. पण तरी वरवर सुखी वाटणाऱ्या अशा लग्नांत सुद्धा तणाव असतात, बाईला खूप तडजोडी कराव्या लागतात हेही तिनं पाहिलं होतं. वाटेल त्या तडजोडी करायची तिची तयारी नव्हती. व्यवसायाच्या दृष्टीने ती एका चांगल्या वळणावर येऊन पोचली होती. एका उत्तम मानल्या गेलेल्या हॉस्पिटलमधे तिला नोकरी होती. हवं त्या पद्धतीने काम करायला मिळत होतं. चांगले सहकारी होते, त्यांच्याशी विचारांची, अनुभवांची देवघेव करताना खूप काही लाभत होतं. मग केवळ लग्न झालं नाही म्हणून काय अडत होतं?
पण हे सगळं स्वत:ला सांगून पटवून सुद्धा अशा वेळा येत की तिला वाटे, एवढंच असतं का आयुष्यात? मग कधीकधी हा एकटेपणा का अंगावर येतो? ज्याच्याजवळ अगदी खोल मनातल्या गोष्टी बोलता येतील असं हक्काचं माणूस असावं असं का वाटतं? हा माझा कमकुवतपणा आहे की ही जगाची रीत आहे?
कदाचित ती असे हेलकावे खात असल्यामुळे म्हणा, पण तिच्यात वरवरच्या ओळखीपेक्षा जास्त रस दाखवणारा भेटला तेव्हा त्याला प्रतिसाद देण्याची तिची मनस्थिती झालेली होती. ती काम करीत होती त्याच शहरात भरलेल्या एका मेडिकल कॉन्फरन्समधे तिच्या सेक्शनमधे तिला एक डॉक्टर भेटला. हिंदीच पण मलेशियात बरीच वर्ष राहिलेला. कॉन्फरन्सच्या तीनचार दिवसांत त्यांची बरीच ओळख झाली. सेशन्सच्या व्यतिरिक्त वेळात ती त्याला शहर दाखवायला जात होती, निरनिराळ्या रेस्टॉरंट्समधे खाऊ घालीत होती. त्यांच्या खूप गप्पा होत होत्या. त्यात एकमेकांच्या कुटुंबांची माहिती, आवडीनिवडी ह्यांची देवघेव झाली. आवडीनिवडी फारशा जुळत होत्या असं नाही, पण त्याला फार महत्त्व आहे असं तिला वाटलं नाही. त्याच्या सहवासात तिचा वेळ खूप मजेत जात होता, पण अजून तरी ह्या सहज झालेल्या मैत्रीचा प्रवास विशिष्ट दिशेने जावा अशी निकड वाटत नव्हती. परत जाताना त्यानं तिला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मला माहीत आहे की मी अगदी थोड्या ओळखीवर हे म्हणतोय. तू विचार कर, तुला हवा तितका वेळ घे. मात्र माझ्या बाजूने माझा विचार