पान:अर्धुक (Ardhuk).pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मामार्गरेटला वाटलं होतं की आता तरी आईबापांचा आपल्या मागचा समेमिरा बंद होईल. पण तिला मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळाला आणि तो सुद्धा केरळापासून इतक्या लांब महाराष्ट्रात, तरी त्यांची लग्न करण्याबद्दल भुणभुण सुरूच राहिली. वर्षातनं एकदा सुट्टी घेऊन घरी गेलं की बघण्याचे कार्यक्रम चालायचे. त्याला वैतागून तिनं सुट्टीच घ्यायचं बंद केलं तर तिचे वडील दर दोन-तीन महिन्यांनी एखाद्या स्थळाची माहिती घेऊन यायचे. ती म्हणायची, "नुसतं एवढ्या माहितीवर मी हो-नाही कसं ठरवणार? मला नाही ही असली पद्धत मान्य."
 "आपल्या देशात सगळ्यांची अशीच लग्न होतात. तू काय एवढी जगावेगळी लागून गेलीयस?"
 "पण निदान माझं शिक्षण संपेपर्यंत तरी थांबू द्या. नाहीतर एवढी धडपड करून मेडिकलला गेल्याचा काय फायदा?"
 "लग्न झाल्यावर शिक्षण पुरं करता येत नाही? किती उदाहरणं दाखवू तुला?"
 तशी तिची दुसऱ्या कुणाशी ओळख होती असं नव्हे आणि होऊनही काही फायदा नव्हता. तिचे आईवडील कट्टर सनातनी होते आणि त्यांना जावई केवळ ख्रिस्तीच नव्हे तर त्यांच्या विशिष्ट पंथातलाच हवा होता.
 ह्याच सुमाराला अमेरिकेला गेलेल्या तिच्या एका लांब लांबच्या भावाचं तिला अचानक पत्र आलं. असंच इकडच्या तिकडच्या गप्पांचं. तिला आश्चर्य वाटलं कारण ते तीन-चारदा भेटलेले होते तरी त्यांच्यात काही खास सूत नव्हतं. तिनं त्याला उत्तर लिहिलं आणि मग त्यांची पत्रापत्री सुरू झाली. आपल्या आवडीनिवडी, मतं खूप जुळतात असं तिच्या ध्यानात आलं. एक दिवस त्यानं तिला लग्नाची मागणी घातली. तिचा होकार आल्यानंतर त्यानं तिला सांगितलं की तो परदेशी जाण्यापूर्वीच्या भेटीच्या वेळी, जेव्हा ती एक निरागस षोडषवर्षा होती, त्यानं ठरवलं होतं की तिच्याशी लग्न करायचं. पण इतरांनी ठरवून तिला आपल्या गळ्यात बांधायचं हे त्याला पटत नव्हतं. त्यानं ठरवलं होतं की ती पुरेशी मोठी होईपर्यंत, स्वत:चा स्वत: निर्णय घ्यायला समर्थ होईपर्यंत थांबायचं.

 मार्गरिटनं लग्नाला होकार दिला तेव्हा तिच्या मनात होतं, लग्न करायचंच तर मग हा थोडा तरी माहीत असलेला, ज्याचे आपले विचार बरेच जुळतात असा माणूस नवरा म्हणून काय वाईट आहे? पण मग त्याने हा सगळा

॥अर्धुक॥
॥७८॥