पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच्या बिझनेसमधल्या महत्त्वाच्या लोकांना पार्ट्या द्यायच्या आणि त्यांचं 'मनोरंजन' करायचं ह्यासाठी त्याला ती हवी होती. प्रथमच एका क्लायंटने तिच्याशी लगट केली तेव्हा तिनं त्याला झटकून टाकलं. ती नवऱ्याला म्हणाली, "मला नाही हे असलं आवडत. तो तुमच्यासमोर माझ्यावर हात टाकतो न तुम्ही त्याला काहीच कसं म्हणत नाही?"
 "आवडून घ्यावं लागेल."
 "म्हणजे?"
 "त्यासाठीच तर मी आणलंय तुला."
 "लाज नाही वाटत असं बोलायला? मला हे खपायचं नाही. तुम्हाला माझ्याबरोबर नीटपणे रहायचं नसलं तर मी निघून जाते."
 त्याने स्मित केलं."निघून कोण जाऊ देतंय तला? चांगले पैसे मोजलेत तुझ्यासाठी, माहीताय? जिथे कुठे जाशील तिथून फरफटत आणीन तुला."
 तो चिडला असता तर वाटली असती त्यापेक्षा किती तरी जास्त भीती तिला त्याच्या थंड क्रूरपणाची वाटली. परिस्थितीतला धोका ओळखून ती भांडण न वाढवता गप्प बसली. तिच्या मनात आलं, बहिणीला हे माहिती असून तिनं आपला विश्वासघात केला असेल? ती काही दिवस थांबली. मुकाट तो म्हणेल तसं वागत राहिली. मग एका रात्री तो झोपला असताना ती गपचूप दार उघडून पळून गेली. बहिणीकडे गेले तर कदाचित ती धोकाच द्यायची म्हणून ती आडवळणांनी जात जात कुठल्या तरी मोठ्या रस्त्यापर्यंत येऊन पोचली. ट्रकला वगैरे हात दाखवण्यात अर्थच नव्हता. बससाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. शेवटी तिला एक बैलगाडी दिसली. त्यात बरेच जण होते. बायामाणसं, पोरं दिसत होती. तिनं गयावया करून त्यांना गाडीत जागा द्यायला लावली. रात्रीतनं कधीतरी ती गावी आली नि आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी मालकिणीकडे जाऊन रडली, "मला माझ्या बहिणीनं फसवलं. तुम्ही मला परत कामावर घेता का?" बाई म्हणाल्या, "मी दुसरी बाई कामाला लावलीय, तिला हाकलून तर देता येत नाही ना?" मंगल म्हणाली, "मग मी काय करू तुम्हीच सांगा. मला दुसऱ्या कुणाचा आधार नाही."

 बाई विचार करून म्हणाल्या, "मुंबईला जाशील का? माझी एक भाची तिथे असते, तिला कामाच्या बाईची फार गरज आहे. जात असलीस तर सांग. मी तुला सोबत देऊन पाठवीन."

॥अर्धुक॥
॥७४॥