पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतकं सगळं ज्याच्याकडे आहे तो आपल्यासारखीशी कशाला लग्न करील असा विचार का कोण जाणे मंगलच्या मनात काही आला नाही. लग्नाच्या कल्पनेनं ती हुरळली. लग्नानंतरचे पहिले काही दिवस तिला आठवले. तेव्हा नवरा तिच्याशी प्रेमाने वागे, तिचे लाड करी, गपचूप तिला एखादी वस्तू, तिच्या आवडीचं काहीखायला आणून देई. कदाचित आपल्या नशिबात तसं सुख पुन्हा असेल असं तिला वाटलं. दोन दिवस रजा काढून ती बहिणीकडे जाऊन आली. तिनं त्याला पाहिलं. तसं व्यंग म्हणजे काय तर त्याचा एक पाय जरा अधू होता आणि चालताना तो थोडा लंगडत होता. त्यांचं तिला काही वाटलं नाही पण तो तिला फारसा आवडला नाही. का ते तिला सांगता आलं नसतं. आणि बहिणीला तसं म्हणायचा तिला धीर झाला नाही.
 बहीण म्हणाली, "तू त्यांना अगदी पसंत आहेस."
 "त्यांनी तर माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काही बोललेही नाहीत."
 बहीण गालातल्या गालात हसून म्हणाली, "जरूर तेवढं पाहिलं. आणि काही माणसं भिडस्त असतात. लग्नानंतर मारतील हो भरपूर गप्पा. मग कधी नक्की करायचं लग्नाचं? जेवढ्या लवकर तेवढं बरं."
 "आईला, बाबांना विचारू या."
 "काही नको. ते उगीच घोळ घालीत बसतील नि संधी हातची निसट्रन जाईल."
 मंगलने नोकरीचा राजीनामा दिला. तिच्या लग्नाला ती, तिचा होणारा नवरा, बहीण, मेव्हणा इतकेच जण हजर होते. तेव्हाच मंगलच्या मनात जराशी पाल चुकचुकली. लग्न म्हणजे तरी काय, त्यांनी एकमेकांना हार घातले, दुसऱ्या दोघांनी त्यांच्यावर अक्षता टाकल्या, पेढे खाल्ले. त्याच्या घरीच समारंभ झाला आणि नंतर तिला तिथेच सोडून बहीण आणि तिचा नवरा निघून गेले. मंगलला सगळंच जरा विपरीत वाटत होतं. इथे दुसरं कुणीच कसंनाही? त्याच्या घरात इतर कुणी माणसं नाहीत? तिला जराशी भीती वाटायला लागली. पण बहीण गावातच आहे म्हटल्यावर थोडा तरी आधार वाटला.

 थोड्याच दिवसांत त्याचं खरं व्यंग काय होतं त्याचा तिला पत्ता लागला. आणि तसं असताना त्यानं आपल्याशी लग्न का केलं त्याचाही पत्ता लागला. सगळं घरकाम, स्वैपाक करायला फुकट मोलकरीण हवी होती. शिवाय

॥अर्धुक॥
॥७३॥