पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ना? मग तसंच जन्मभर करीन. पण हे वडलांसमोर बोलायचं तिला धाडस झालं नाही. तिचे वडील आणि भाऊ तिच्या नवऱ्याला भेटून त्याच्याशी बोलणं करायला गेले. मंगलच्या सुदैवाने तिच्या नवऱ्याचा तिला परत स्वीकारण्याचा काही इरादा नव्हता. तो तिला नांदवण्यासाठी खूप पैसे मागायला लागला तेव्हा तिचे वडील त्याला शिव्या देत परत आले.
 मंगलचं आयुष्य सुरळित चाललं होतं आणि त्यात ती आपल्या परीने समाधानी होती. एखाद्या वेळी इतरांसारखा आपला संसार असावा, मुलं बाळं असावी असं तिला वाटे पण ते आपल्या नशिबातच नाही अशी ती स्वत:ची समजूत करून घेई. एक दिवस अचानक तिची बहीण आणि मेव्हणा तिला भेटायला आले. मंगल म्हणाली, "इकडे कुठे? का काही काम काढलं होतं?" बहीण चटकन बोलेना तेव्हा मंगल म्हणाली, "बोला की दाजी."
 "तुझ्याकडेच काम होतं."
 "माझ्याकडे?"
 "तुला पुन्हा लग्न करायचं का?"
 "मी तसा विचारच केला नाही आणि पहिलं लग्न मोडल्याशिवाय कायद्याने दुसरं करता येत नाही ना?"
 "आता नवऱ्याला सोडून तुला पाच-सात वर्ष झाली, म्हणजे तुझं लग्न मोडल्यातच जमा आहे."
 "बरं समजा असलं, तरी माझ्याशी कोण लग्न करणारे? तुम्ही असं का विचारताय मला?"
 मग बहीण म्हणाली, "ह्यांचा एक मित्र आहे. त्याच्यात थोडंसं व्यंग आहे म्हणून त्याचं लग्न झालेलं नाही. एकदा बोलता बोलता विषय निघाला न् आम्ही त्याला तुझ्याबद्दल सांगितलं. तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे."
 एकदम गुंतागुंतीच्या परिस्थितीला तोंड द्यायला लागलं किंवा आपण कसल्यातरी दबावाखाली आहोत अशी जाणीव झाली की मंगलची जीभ अडखळायला लागायची. ती चाचरत म्हणाली, "पण क-क-कोण आहे हा म-म-माणूस? त्याला भेटल्याशिवाय मी कसं काही सांगू?"

 "आम्ही तुझी त्याची गाठ घालून देऊ की. पण आम्ही काय तुझं नुकसान का करणार आहोत? चांगला माणूस आहे. ह्यांना खूप वर्ष माहिती आहे. त्याचा बिझनेस आहे, भरपूर पैसा मिळवतो, स्वत:चं घर आहे. तुझ्या जन्माचं कल्याण होईल."

॥अर्धुक॥
॥७२॥