पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शक्यता जास्त महत्त्वाची होती, त्यांच्या साखर कारखान्यातल्या नोकरीतून ते निवृत्त झाले होते. मुलाला कायम नोकरी नव्हती आणि त्याचा संसार मात्र वाढत होता. तिच्या पोटगीच्या निमित्ताने त्यांच्या संसाराला हातभार लागला तर त्यांना हवा होता. शेवटी त्यांच्या हट्टापायी तिनं त्यांनी पुढे केलेल्या कागदपत्रांवर अंगठा उठवला. तिच्या नवऱ्याने वकिलातर्फे आपलं उत्तर कळवलं. मी काही बायकोला सोडून दिलेली नाही. ती आपल्या पायाने माझं घर सोडून माहेरी जाऊन राहिलीय. तशातूनही ती परत आली तर मी तिला नांदवायला तयार आहे. तेव्हा पोटगी देण्याचा प्रश्नच नाही.
 मग अघटितच घडलं. वडील म्हणायला लागले. तो येवढा म्हणतोय तर तू का नाही जात परत? मंगलला हे खरंच वाटेना.
 ती म्हणाली, "त्यांच्याकडे परत जायला तुम्ही कसं सांगता? मग मला वाचवलंत कशासाठी? मरू द्यायचं होतंत."
 वडील चिडले. "म्हणजे येवढं आम्ही केलं तुझ्यासाठी, त्याचं तुला काहीच नाही. तुझ्यावरच्या मायेपोटीच आम्ही येवढी धडपड केली ना?"
 "मग माया असली तर तुम्ही मला त्याच्याकडे परत कसं पाठवता?"
 वडलांनी तिची समजूत घालण्याच्या प्रयत्न केला. "कुणास ठाऊक, कदाचित त्याला आपण केलं त्याचा पश्चाताप झाला असेल. माणसं बदलतात."
 "मग इतकी वर्ष त्यानं माझी साधी विचारपूस सुद्धा कशी केली नाही? आता पोटगी द्यायला नको म्हणून तो मला नांदायला बोलावतो. त्याच्यावर विश्वास कसा टाकायचा? उलट आता जास्तच धोका आहे. मला मारूनच टाकायची म्हणजे पोटगी मागायचा प्रश्नच नको."
 "असं वेडंवाकडं मनात आणू नको."
 "का नको? एकदा घडलंय ना." ती रडायला लागली. "मी तुम्हाला इतकी जड झालेय का?"
 "आमचं पोटचं मूल आम्हाला कसं जड होईल? पण आम्ही काय तुला जन्मभर पुरणार आहोत का? आमच्या मागं तुझं कसं होईल? एकटीनंच सारा जन्म काढणार आहेस का?"

 वडील गेल्यावर मंगलने खूप विचार केला. जळून मरण्यापेक्षा एकटीनं जन्म काढायला काय हरकत आहे? नाही तरी आता आईवडलांचं घर माझ्या हक्काचं कुठ राह्यलंय? मी एकटीच राहून पोटाला मिळवून खातेय

॥अर्धुक॥
॥७१॥