पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पगारातले काही पैसे त्यात भरायला लागल्या. एकदोन महिने पैसे कमी आल्यावर लगेच तिच्या वडलांचं पत्र आलं. तिनं लिहिलं की अंगावरची साडी पारच फाटली होती, नवी घ्यावी लागली त्याला पैसे गेले. त्यावर वडलांचं उपदेशपर पत्र आलं. आपली परिस्थिती समजून घेऊन काटकसरीने रहात जावे, उगीच उधळपट्टी करू नये. आपण खोटं बोललो म्हणून मंगलला वाईट वाटलं, पण खरं सांगितलं असतं तर वडील रागवले असते. मात्र आता दर महिन्याला कमी पैसे पाठवले म्हणजे काय सबब सांगायची हा प्रश्न होताच.
 भावाचं लग्न ठरलं तेव्हा वडलांनी मंगलला उचल मागायला सांगितली. तिला ते फार अवघड वाटत होतं. तिनं चाचरतच मालकिणीला विचारलं. मालकीण सहज कबूल झाली. आईनं निदान आठवडाभराची सुट्टी काढून घरी ये म्हणून बोलावलं. वऱ्हाडीमंडळी खूप जमणार तेव्हा राबायला कुणी तरी हवंच. मंगलची थोरली लग्न झालेली बहीण मला इतके दिवस पाठवीत नाहीत म्हणून अंगाबाहेर टाकून मोकळी झाली. वऱ्हाड लग्नघरी गेल्यावर मंगलला आईनं सांगितलं शक्यतो सगळ्यांच्या समोर येऊ नको म्हणून. तिला नेमकं काय झालं हे व्याह्यांच्या घरी कुणाला माहीत नव्हतं. तिला पाहून कुणीतरी प्रश्न विचारायचे, मग वळवळत्या जिभांनी एकाचे दोन करून सगळीकडे खोटंनाटं पसरवायचं कशाला? मंगलला वाटलं, मला भावाच्या लग्नात मिरवायचासुद्धा हक्क नाही.स्वत:च्या घरी आल्यावर तिनं मोकळा श्वास घेतला.
 तीन-चार वर्ष सगळं सुरळित चाललं होतं. एक दिवस एकदम तिचे वडील तिला भेटायला आले. म्हणाले,"तुझ्या नवऱ्यावर पोटगीसाठी दावा लावायचाय."
 "कशाला? आपल्याला काय कमी आहे?"
 तिच्या मनात तिच्या नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल कित्येक दिवसांत काही विचारही आला नव्हता. आता त्या सगळ्याच गोष्टींची आठवण आल्यावर तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
 वडील म्हणाले, "तुझा हक्क आहे पोटगीचा. त्याचं दुकान चांगलं चाललंय, भरपूर पैसा मिळतोय. तुला त्यातला वाटा मिळायला पाहिजे."
 "दुसरं लग्न करायचं म्हणून ज्यानं मला जाळून मारायचा घाट घातला त्याचे पैसे कशाला पायजेत आपल्याला?".

 तिला कळलं होतं की तिच्या हक्कापेक्षा त्यांना त्यातून पैसे मिळण्याची

॥अर्धुक॥
॥७०॥