पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असं ठरवून ती नोकरी बघायला लागली. शिक्षण झालेलं नाही, कसलंच कसब नाही, तिला नोकरी तरी कसली मिळणार? शेवटी ती आसपासच्या बायांबरोबर खुरपणीला जायला लागली. पण ते काम तिला जमेना. साताठ तास डोक्यावर ऊन घेतं कष्ट करायची तिला सवय नव्हती. ह्या सुमाराला तिची एक माहेरी आलेली मैत्रीण तिला भेटली. तिचं जवळच्या जरा मोठ्या गावात लग्न झालं होतं. तिनं मंगलला विचारलं, "तू घरकाम, स्वैपाक करशील का? आमच्या इथले एक बागाईतदार आहेत. त्यांची स्वैपाकीण काम सोडून गेलीय. त्या वहिनी मला विचारीत होत्या तुला कुणी माहिती आहे का म्हणून."
 "पण मला जमेल का?"
 "न जमायला काय झालं? घरी स्वैपाक करतेस ना त? बघ, येत असलीस तर चल माझ्याबरोबर. मी तुझी त्यांची गाठ घालून देईन. दोन दिवस माझ्याकडे रहा. नोकरीचं जमलं तर तुझ्यासाठी भाड्यानं खोली बघू."
 हो ना करता मंगल तयार झाली. ती कायम आपल्याकडे रहाणार म्हणून भावाची थोडी कुरकूर चाललीच होती. आईनंही मग भर घातली.
 नोकरी मिळाली आणि मंगल भाड्याच्या खोलीत रहायला गेली. आधी तिला एकटं रहाणं अवघड वाटत होतं. पण शेवटी कुणाचं तरी मिंधं होऊन रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहाणं बरं असं वाटलं. काही काळ तिला आपल्या विद्रूप झालेल्या कातडीची लाज वाटायची, पण साडी चांगली लपेटून खालमानेनं चाललं की सहज बघणाऱ्याच्या लक्षात सुद्धा येणार नाही अशा तऱ्हेनं भाजलेला भाग लपून जात असे. कुणी आवर्जून विचारलंच तर स्वैपाक करताना भाजलं म्हणून सांगायची.
 जिथे काम करायची ते मुलाबाळांचं पाहुण्यारावळ्यांचं कुटुंब होतं. काम भरपूर होतं पण माणसं चांगली होती. पगार बरा होता, शिवाय उरलं सुरलं अन्न मिळायचं त्यात तिचं रोज एखादं जेवण भागायचं. शक्य तितका पगार वाचवून ती आईवडलांना पाठवायची. तिच्या मालकिणीनं तिला एकदा विचारलं तू काही पगार बाजूला ठेवतेस का म्हणून. मंगल म्हणाली नाही.
 "का नाही? सगळेच पैसे आईवडलांना पाठवू नको. स्वत:साठी काहीतरी राखून ठेव. नाहीतर म्हातारपणी तुला काय आधार?"

 त्यांनी मंगलच्या नावानं बँकेत खातं उघडलं आणि परस्परच तिच्या

॥अर्धुक॥
॥६९॥