पान:अर्धुक (Ardhuk).pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंगलने कष्टाने डोळे उघडले. समोर तिला तिची आई दिसली. दुसऱ्या क्षणी असह्य वेदनांची जाणीव होऊन आपण कशासाठी शुद्धीवर आलो असा तिला प्रश्न पडला. तिचं विव्हळणं ऐकून आईनं तिच्याकडे पाहिलं. ती शुद्धीवर आलीय असं पाहून आईच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. डॉक्टरांनी कितीही सांगितलं तरी मंगल शुद्धीवर येईल, जगेल असा तिला विश्वास वाटत नव्हता.
 हळूहळू काय झालं त्याची मंगलला आठवण आली. पण आईला पाहिल्याचं तिला आठवत नव्हतं. आईनं तिला सगळ्याची कल्पना दिली आणि पोलिस तिचा जबाब घ्यायला यायच्या आत त्यांना काय सांगायचं ते पढवून ठेवलं. त्याप्रमाणे तिनं सांगितलं, "स्टोचा भडका झाला आणि एकदम साडी पेटली. साडी पेटली म्हटल्यावर मी घाबरून बेशुद्ध पडले. बाकी मला काही आठवत नाही." साडी पेटली तर फक्त छाती, पाठ गळा इतकंच कसं भाजलं? तुझा नवरा कुठे आहे? सासू-सासरे? दवाखान्यात आईवडलांनी कसं आणलं? त्यांना कुणी कळवलं? ह्या प्रश्नांची तिनं उत्तरं दिली नाहीत. मला माहीत नाही आठवत नाही एवढंच ती म्हणे. खरी गोष्ट तिच्या आईवडलांना शेजाऱ्यांकडून कळली होती. तिच्या नवऱ्यानं आणि सासूनं तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावून गेले म्हणून ती वांचली. पण ते साक्ष द्यायला तयार नव्हते. त्यांना पोलिसांच्या लफड्यात पडायचं नव्हतं. पुन्हा आरोप सिद्ध झाला नाही तर मंगलच्या सासरच्या कुटुंबाशी फुकट वैर कशाला असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा मंगलच्या आईवडलांनी ठरवलं होतं की उगीच कोर्टकचेऱ्या, खटले ह्या भानगडीत पडायचंच नाही. पोरीला आपल्याकडे ठेवून घ्यायचं नि गप्प बसायचं.

 मंगल संपूर्ण बरी होऊन हॉस्पिटलमधून घरी जायला सहा महिने लागले. तिच्या भाजल्याच्या जखमा बऱ्या झाल्या पण त्या व्रणांमुळे तिची कातडी वेडीवाकडी ओढली जाऊन विद्रूप दिसत होती. डॉक्टर म्हणाले प्लॅस्टिक सर्जरीने कातडी पूर्ववत होऊ शकेल. पण आधीच खूप खर्च झालेला. मंगलचा बाप काही कुणी मालदार नव्हता. त्याला आणखी खर्च करणं झेपणारं नव्हतं. मंगलही काही बोलली नाही. आईवडलांनी इतकं केलं, मरणाच्या दाढेतून आपल्याला ओढून काढलं, एवढा खर्च केला ह्याचंच तिला ओझं वाटत होतं. आता ह्यापुढे तरी आपला बोजा त्यांच्यावर टाकायचा नाही

॥अर्धुक॥
॥६८॥