पगार बेताचा होता, पण एकतर आपण मिळवू शकतो, स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतो ही जाणीव सुखद होती. शिवाय घरातल्या कटकटी, सगळ्यांच्या दुःस्वासाला तोंड देणं ह्यापासून रोज काही काळ तिची सुटका होत होती. अर्थात घरी गेल्यावर त्याचा वचपा काढला जायचा. नोकरी करून ती कुटुंबाचं पोषण करते ह्याबद्दल तिचं कौतुक करणं तर राहिलंच, उलट सगळ्यांना तिचं वैषम्यच वाटायचं. ती नोकरी करते म्हणून चढेलपणा दाखवते, बाहेर काम करते ह्या सबबीखाली घरकाम अंगाबाहेर टाकते, हिनं लोकांच्या पोरांची काळजी करायची नि आम्ही हिच्या मुलाला संभाळायचं, अशा तक्रारी चालू रहायच्या. खरं म्हणजे तिचा मुलगा आता काही लहान नव्हता. तो दिवसभर शाळेत असायचा. त्याला काही संभाळायला लागायचं नाही. शिवाय तो हिचा मुलगा होता तर त्यांचा नातू, भाचा,पुतण्या नव्हता का?
कधीकधी आपण हे सगळं सहन का करतो असा तिला प्रश्न पडायचा. पण दुसरा काही मार्ग दिसत नव्हता. माहेरी थोड्या दिवसांसाठी सुद्धा जायची तिची तयारी नव्हती. आईवडलांबद्दलचा राग तिच्या मनात अजून धुमसत होता. शिवाय तिथे खोटा मुखवटा लावून वागणं तिला असह्य झालं असतं. कायम जायचं तर त्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं असतं अशी तिची खात्री नव्हती. पदरात मूल घेऊन माहेरी आलेल्या मुलीला ये म्हणणारे किती आईबाप असतात? शिवाय मग ते परत नवऱ्याकडे जाण्यासाठी तिचं मन वळवणार, काही तडजोड शक्य आहे का त्याची वारंवार चाचपणी करणार. ते तिला नको होतं. मुलाला घेऊन एकटीनं रहाणं सध्या तरी शक्य नव्हतं. शिवाय सासरची माणसं मुलाला तिच्याबरोबर जाऊ देतील की नाही ह्याची शंका होती. तेव्हा भविष्यकाळात वेगळं काही आपल्या वाट्याला येईल असं स्वप्न न रंगवता ती आला दिवस रेटत राहिली. मुलगा उत्तम तऱ्हेनं एस.एस.सी. पास झाल्यावर तिने मुद्दाम बापाच्या अमंगळ छायेतून काढून त्याला कॉलेजसाठी लांब पाठवलं आणि त्याच वर्षी तिच्यासमोर एकदम एक दार उघडलं गेलं. तिच्या संस्थेच्या कामाचा खर्च अंशत: एका अमेरिकन ट्रस्टतर्फे मिळणाऱ्या देणगीतून मागत होता. त्या ट्रस्टने हिंदुस्थानातल्या शहरांतल्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची पाहणी करण्यासाठी एक अभ्यासगट पाठवला होता.