पान:अर्धुक (Ardhuk).pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुंबईच्या पहाणीत मदत करायला सपनाच्या संस्थेनं तिला नेमलं. तिनं केलेल्या कामावर अभ्यासगटाचे प्रमुख खूष झाले. त्यांनी तिला विचारलं, "आमच्या संस्थेत तुला नोकरी देऊ केली तर तू घेशील का?" ती विचार करून सांगते म्हणाली. पण खरं म्हणजे विचार कसला करायचा होता? असह्य परिस्थितीतून सुटकेचा मार्ग तिला योगायोगाने मिळाला होता. प्रश्न फक्त मुलाचा होता पण त्याने आडकाठी केली नाही. मग तिने तातडीने निर्णय घेऊन टाकला.
 सगळी तयारी झाल्यावर, अमेरिकेहून तिकिट हातात पडल्यावरच तिनं घरात त्याची वाच्यता केली. अर्थातच मोठं वादळ उठलं आणि सगळ्यांनी तिचा पाय मागे ओढण्याची शिकस्त केली. पण त्यांनी काहीही म्हटलं तरी तिच्यात अपराधीपणाची जाणीव निर्माण झाली नाही. ह्या आपमतलबी, ढोंगी लोकांसाठी केलं हेच फार झालं असं तिला वाटत होतं. तिनं ठरवून टाकलं होतं की नोकरीची मुदत वाढवून मिळाली तर घ्यायचीच, पण शक्य तर मुलाला तिकडे नेण्याची सोय करून तिथंच रहायचं.ज्यासाठी आवर्जून परत यावं असं तिचं ह्या देशात काहीच नव्हतं.

॥अर्धुक॥
॥५९॥