पान:अर्धुक (Ardhuk).pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करून घेणं शक्य नव्हतं. आपण गर्भार आहोत हे तिनं कुणाला सांगितलं नाही. आपोआप कळलं तेव्हा तिचं फारसं कुणी कौतुक वगैरे केलं नाही. ती स्वत: तर घरातल्या एवढ्या गर्दीत आणखी एक जिवाची भर पडणार ह्या कल्पनेने धास्तावून गेलेली. सासूनं बाळंतपणासाठी माहेरी जाण्याची गोष्ट काढली ती सपनानं मनावर घेतली नाही. ह्या सुमाराला तिचा भाऊ मुंबईला आला होता तेव्हा तिच्या घरी आला. त्याने आईला बातमी दिली तेव्हा तिनं सपनाला बाळंतपणाला बोलावलं. तिनं कळवलं इथे सगळ्यात उत्तम वैद्यकीय सोयी असताना मुद्दाम लहान गावात कशाला बाळंतपण करून घ्यायचं असं सगळ्यांचं म्हणणं पडतंय.
 पुढेसुद्धा ती काही ना काही सबब सांगत माहेरी गेलीच नाही तेव्हा तिला नवऱ्याला सोडून येववत नाही म्हणून आईनं कौतुक केलं.
 सुरुवातीला दारूच्या नशेत नसे तेव्हा तरी नवरा तिच्याशी बरा वागायचा. जसजसा व्यसनात जास्त जास्त गुरफटत चालला तसा जास्त चिडचिड करायचा. एकदा तिने व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याबद्दल बोलणं काढलं तर त्याने एकदम बिथरून तिला शिवीगाळी, मारहाण करण्यापर्यंत मजल गाठली. तेव्हापासून ती त्याच्यापासून चार हात दूरच रहायला शिकली. तो जवळजवळ रोजच कामावरून येताना पिऊन घरी यायचा. ती कामाच्या निमित्ताने स्वैपाकघरातच घोटाळत रहायची आणि तो झोपल्याची खात्री झाली की खोलीत जायची.

 नवरा हळूहळू पूर्णपणे दारूच्या आहारी जात चालला होता. त्याचा परिणाम व्हायचा तोच होऊन त्याची नोकरी गेली. दुसरी नोकरी लागण्याची शक्यताच नव्हती. त्याला काही ग्रॅच्युइटी मिळाली होती त्याच्यावर त्यांचा प्रपंच थोडे दिवस चालला. मग सासऱ्याच्या पेन्शनवर कसं भागणार म्हणन तिनं नोकरी शोधायला सुरुवात केली. तिला कसलाच अनुभव नव्हता, शिक्षण अर्धवट सोडलेलं. काम तरी कसलं मिळणार? सुदैवाने त्यांच्याकडे अधूनमधून येणाऱ्या लांबच्या नात्यातल्या एक बाई होत्या त्यांनी तिला काम देऊ केलं. त्यांची संस्था रस्त्यावरच्या अनाथ मुलांसाठी केंद्र चालवीत होती. प्रत्येक केंद्रात अशा मुलांना आणायचं, जेवण द्यायचं, थोडंफार शिकवायचं. एकदोन केंद्रात जरा मोठ्या मुलांना कोणतं तरी काम शिकवलं जात असे.

॥अर्धुक॥
॥५७॥