पान:अर्धुक (Ardhuk).pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नोकरीला होता. बघताक्षणी छाप पडावी असा उंचनिच, रुबाबदार, देखणा. बघण्याच्या समारंभात तो सपनाकडे बघून अर्थपूर्ण हसला ते सपनाला फार भावलं. जणू तो तिला सांगत होता की बाकीच्यांचं काय चाललंय ते चालू दे, पण खरा मामला तुझ्या-माझ्यात आहे. तिचं कॉलेजचं एक वर्ष राहिलंय हे ऐकून तिची सासू म्हणाली, "त्याची तुम्ही काळजी करू नका. तिची हौस असली तर तिला कितीही शिकवायला आम्ही तयार आहोत नाहीतरी घरकामाचा बोजा काही तिच्यावर पडणार नाही. तेव्हा तिला तरी फावल्या वेळात उद्योग नको का?"
 सपना श्रीधरची बायको झाली ती मनातल्या मनात आईवडलांनी आपलं हितच पाहिलं अशी कबुली देत. शेवटी राजेंद्राच्या घरच्यांशी आपल्याला जमवून घेता आलं असतं की नाही कोण जाणे. आईचं बरोबर होतं. काही झालं तरी तिनं चार पावसाळे जास्त पाह्यलेत ना. पण सासरी पोचल्या पोचल्याच तिला संसाराच्या सुखस्वप्नातून खडबडून जाग आली. आपलं लग्न खोटेपणाच्या पायावर उभं आहे हे तिला कळून चुकलं. सासरच्यांनी आर्थिक परिस्थितीची जी कल्पना दिली तीच आधी खोटी होती. सासू-सासरे, दोन दीर, नणंद आणि श्रीधर एका तीन खोल्यांच्या जुन्यापान्या फ्लॅटमधे रहात होते. श्रीधर सगळ्यात थोरला. त्याला पगार चांगला होता पण एवढ्या मोठ्या कुटुंबात तो एकटाच मिळवता. तरी त्याच्या जिवावर, बऱ्यापैकी सधन घरात लाडाकोडाने वाढलेल्या सपनाने आहे ह्या परिस्थितीशी जुळवून घेतलंही असतं. पण काही दिवसांतच त्याला दारूचं व्यसन आहे असं कळल्यावर आपली सर्वच आघाड्यांवर फसवणूक झालीय असं तिच्या ध्यानात आलं. तिला सासरच्यांचा राग आलाच पण त्याहीपेक्षा आईवडलांचा आला. तिचं लग्न करून टाकण्याच्या घाईमुळे ओळखीच्या मध्यस्थांतर्फे आलेलं स्थळ जुजबी सुद्धा चौकशी न करता त्यांनी स्वीकारलं होतं.

 शिक्षण पुरं करण्याबद्दल तिनं नवऱ्याकडे गोष्ट काढली. तो म्हणाला वर्षाच्या मधेच तुला कुणी अँडमिशन देणार नाही, नवं वर्ष सुरू होईपर्यंत थांबावं लागेल. पण त्याच्या आतच तिला दिवस गेले. त्याबद्दल आनंद वाटून घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. तिनं गर्भपाताबद्दल ऐकलं होतं, पण ह्या प्रचंड शहरात काही ओळखीपाळखी नसताना घरच्यांच्या नकळत गर्भपात

॥अर्धुक॥
॥५६॥