पान:अर्धुक (Ardhuk).pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "पण का? आम्ही का लग्न करू नये?"
 "ते तुझं तुला समजत नसलं तर समजावून सांगण्याची मला काही गरज वाटत नाही."
 नंतर तिच्या आईनं तिच्यापाशी उजळणी केली होती. तो वेगळ्या जातीचा आहे. त्यांच्यातल्या चालीरीती, खाणंपिणं सगळं वेगळं असतं. त्याचे आईवडील फारसे शिकलेले सुद्धा नाहीत. आपल्या घरातल्यासारखं सुशिक्षित, सुसंस्कृत वातावरण तुला तिथे मिळणार नाही, वगैरे. सपनाची काही समजूत पटली नव्हती. पण तिची समजूत पटली की नाही ह्याला काही महत्त्व नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायला निघाली तेव्हा तिच्या वडलांनी तिला बजावलं, "तुला वाटत असेल की एकदा तू कॉलेजात गेलीस की आम्ही काही तुझ्यावर नजर ठेवू शकणार नाही. पण एवढं ध्यानात ठेव की तू त्याची गाठ घेतलीस किंवा त्याच्याशी बोललीस असं कानावर आलं तर तुझं कॉलेज बंद."
 सपनाने घडलेलं सगळं लिहून ते राजेंद्राला दिलं. त्यावर त्याने उत्तर लिहिलं ते सर्वस्वी हताश होतं. त्याच्या आईवडलांनी आधी नाखुषीने का होईना, कॉलेज पुरं होईपर्यंत थांबायच्या अटीवर ह्या लग्नाला संमती दिली होती. पण तिचे आईवडील परवानगी देत नाहीत म्हटल्यावर ते चिडले होते. त्यांना काय वाटलं आपण कोण आहोत म्हणून? आम्ही कुठल्याही बाबतीत त्यांच्यापेक्षा कमी नाही. काही गरज नाही त्या मुलीमागे लागायची. तिच्यापेक्षा सरस अशा छप्पन्न मुली मिळतील आम्हाला. राजेंद्र संपूर्णपणे पराधीन होता. मधेच कॉलेज सोडून नोकरी मिळवणं आणि सपनाशी लग्न करणं त्याला अशक्य कोटीतलं वाटत होतं. त्यानं तिला नुसता सबुरीचा सल्ला दिला. मित्रमैत्रिणींकरवी पत्रांची देवघेव एवढा एकच संपर्काचा मार्ग त्यांच्यापुढे उरला.

 सपनाच्या आईवडलांनी स्थळं बघायला सुरुवात केली होती. सपनाने सांगून पाहिलं, "माझं कॉलेजचं आणखी एकच वर्ष उरलंय. तेवढं तरी पुरं करू दे मला." पण रोज तो माणूस डोळ्यांसमोर असेपर्यंत सपना काय करील ह्याची तिच्या आईला शाश्वती वाटत नव्हती. तेव्हा शक्य तितक्या लवकर तिला लग्नबंधनात अडकवून टाकलेलं बरं असा तिचा हिशेब. एक चांगलं स्थळ लवकरच आलं. मुलगा एका चार्टर्ड अकाउंटंट्सच्या फर्ममधे

॥अर्धुक॥
॥५५॥