सपना आईवडलांच्या अनपेक्षित हल्ल्याने स्तंभित झाली. खरं म्हणजे अशी गोष्ट लपून रहाणार नाही ह्याची जाण आपल्याला असायला पाहिजे होती आणि आपण त्यांना आधीच सांगायला हवं होतं असं तिला वाटून गेलं. पण आता त्याला उशीर झाला होता.
"कुठं गेली होतीस?"
"जादा तास होता."
"खोटं. जादा तास वगैरे काही नव्हता. मी वसुधाच्या घरी फोन करून चौकशी केली."
वडील म्हणाले, "तिची उलटतपासणी काय घेत्येयस? सरळच सांग की. हे बघ सपना, तू राजेंद्र भोसलेंबरोबर हिंडतेस ते आम्हाला समजलं आहे. आता तुझा खोटेपणा, लपाछपवी बंद आणि त्याला भेटणंही बंद. समजलं?"
"पण बाबा-"
"पण बिण काही नाही. मी सांगितलं ते पुरेसं स्पष्ट आहे."
आई मधेच म्हणाली, "इतके दिवस तु अशी खोटेपणानं वागलीस. आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलास."
"आई, राजेंद्राला भेटते हे तुमच्यापासून लपवलं हे चुकलं माझं. पण मी काहीही गैर केलेलं नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत."
वडील मोठ्याने हसले. "कुठल्या कादंबरीत वाचलंस हे? प्रेम म्हणे. प्रेम कशाशी खातात तुला कळतं का?"
"असं का म्हणता?"
"तुझं वय काय आहे? अनुभव काय आहे? कॉलेजात वर्ष-दोन वर्ष काढल्यावर आपल्या सबंध आयुष्याबद्दल निर्णय घेण्याइतका शहाणपणा आपल्यात आलाय अशी कल्पना आहे तुझी? लग्नासारखी बाब तू आम्हाला न विचारता सवरता परस्पर ठरवून मोकळी होतेस?"
"मी कबूल केलं ना की तुम्हाला विश्वासात घेतलं नाही ते चुकलं माझं म्हणून?"
"विश्वासात घेतलं असतंस तर इतक्या थराला गोष्टी जाऊच दिल्या नसत्या आम्ही. वेळीच हा मूर्खपणा बंद केला असता."