पान:अर्धुक (Ardhuk).pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे तिच्या लक्षात आलं. तिनं खोलीचं दार उघडलं आणि दारातच त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं. तिला वाटलं कदाचित लग्नाचं निमंत्रण द्यायला आला असेल. ते आपल्याला देण्याची हिंमत त्याला झाली ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. पण त्याखेरीज त्यानं भेटायला यायचं दुसरं काही कारण तिला दिसेना.
 तो म्हणाला, "मला आत तरी येऊ दे."
 "कशाला? तू काय गप्पा मारायला आलायस? पटकन काम काय आहे ते सांगून टाक आणि जा. त्यासाठी आत यायची काय गरज आहे?"
 "सुवर्णा, तू मला इतकं परक्यासारखं वागवू शकतेस? काही दिवसांपूर्वी तु माझ्यावर प्रेम करीत होतीस. निदान तू तसं म्हणत होतीस. का ते सगळं खोटंच होतं?"
 "त्यावेळी ते खरं होतं."
 "आता लगेच तू ते सगळं विसरलीस?"
 "तू विसरायला लावलंस, प्रसाद."
 "मी नाही तुला विसरू शकत. मी खूप प्रयत्न केला पण आपलं नातं मी तोडू शकत नाही." तो त्वेषाने बोलत होता आणि क्षणभर श्वास रोखून धरीत ती ऐकत राहिली. "घरच्यांच्या खातर मला लग्न करावं लागतं आहे पण माझ्या हृदयातलं तुझं स्थान अढळ राहील. मी तुला पूर्वीप्रमाणे भेटत राहीन. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही."
 "तू माझी चेष्टा करतोयस की गंभीरपणे बोलतोयस हे मला कळत नाही. चेष्टा असली तर ती फार दुष्ट आहे. गंभीरपणे म्हणत असलास तर मी तुला कधी कळलेच नाही असं म्हणायला पाहिजे."
 "तुझा अपमान करायची माझी इच्छा नाहीये. सुवर्णा. माझं तुझ्यावर अजूनही फार प्रेम आहे."
 "प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या भानगडीत पडू नको. झालं एवढं बास झालं. आता जा आणि पुन्हा कधी मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस."
 "सुवर्णा प्लीज, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला आत तरी येऊ दे. माझं नीट ऐकून घे."
 "मला काहीही ऐकायचं नाही. ऐकलं तेवढंच फार झालं."

 त्यानं तिला बाजूला सारून खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला पण तिने संतापून त्याला अक्षरश: ढकलून बाहेर काढलं आणि दार लावून घेतलं. मग

॥अर्धुक॥
॥५१॥