पान:अर्धुक (Ardhuk).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला पटत होतं की काही कामधंदा न करणाऱ्या माणसाशी लग्न करणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे. पण तिला त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता. तो तिच्या नवऱ्यासारखा कोरडा नव्हता. त्याचं प्रेम शब्दांतून, स्पर्शातून व्यक्त होत होतं आणि त्याचा अनुभव तिच्या कोमेजून गेलेल्या मनाला, शरीराला उल्हसित करीत होता.
 तिनं उडत उडत ऐकलं की त्याच्यासाठी मुली बघताहेत. तिनं त्याला सरळच विचारलं तेव्हा तो हो म्हणाला.
 "घरच्यांच्या समाधानासाठी काही गोष्टी कराव्या लागतात."
 "तू त्यांना आपल्याबद्दल काही सांगितलंच नाहीस का?"
 "तुला माहीताय माझे आईवडील आपल्या लग्नाला कधीच संमती देणार नाहीत."
 "त्यात नवीन काय आहे? इतक्या खालच्या जातीच्या मुलीला ते सून म्हणून पत्करणार नाहीत हे तुला पहिल्यापासूनच माहिती होतं. कधीतरी त्यांना हे सांगून त्यांचा राग ओढवून घ्यावाच लागणार आहे. मग आत्ता सांगून का नाही टाकत?"
 "जरा दम धर. असल्या गोष्टी एकदम घाईने करता येत नाहीत."
 "ह्यात घाई काय आहे, आपली ओळख झाल्याला दोन अडीच वर्ष झाली. आता आणखी कशासाठी थांबायचं ते मला कळत नाहीये. तू मुली पहायला संमती देणं ही त्या मुलींची आणि तुझ्या आईवडलांची फसवणूक नाही का?"
 प्रसादनं तिला काही दादच दिली नाही अणि शब्दांच्या हुलकावण्या देणं सुरू ठेवलं तेव्हा तो आपल्याशी लग्न करणार नाही हे कडू सत्य तिनं स्वीकारलं. तिनं आपल्या मनाची समजूत घातली की आपण प्रेम करावं इतकी प्रसादची लायकीच नाही. कुटुंबियांच्या मागे दडून अशी बेइमानी करणारा माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला हेच आपलं सुदैव असं तिनं स्वत:ला पटवण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस त्याच्या असण्यामुळे मधुर झालेलं जीवन एकटेपणामुळे पुन्हा रखरखीत होणार होतं. पण त्याला काही पर्यायच नव्हता. त्याने तिला भेटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तिनं निश्चयानं त्याला दूर ठेवलं. त्यानं लिहिलेली पत्रं न वाचता फाडून टाकली. शेवटी त्याने तिचा नाद सोडून दिला. निदान तिला असं वाटलं.

 एक दिवस अवचित तो तिच्याकडे आला. अंधाराची वेळ पाहून आला

॥अर्धुक॥
॥५०॥