पान:अर्धुक (Ardhuk).pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रक्त फार कमी आहे म्हणाला. त्यासाठी इंजेक्शनं द्यावी लागतील म्हणाला. इतक्या लांब इंजेक्शन घ्यायला वरच्यावर येता येणार नाही असं दशरथने त्याला सांगितलं. तेव्हा त्याने गोळ्या लिहून दिल्या. खूप दिवस घ्याव्या लागतील म्हणाला. खाण्यापिण्यावर जरा लक्ष ठेवा, भाज्या बिज्या भरपूर खायला पाहिजेत म्हणाला. दशरथने औषधांच्या दुकानात जाऊन पाचसहा दिवसांपुरती औषधं आणली.
 तेवढ्यापुरती नकुसाची तब्बेत जरा सुधारली. ती म्हणाली, "अवं, औषधं संपल्यात. बाजारच्या दिशी गावात जाल तवा घिऊन या."
 "हां तुला इरभळ औषधाचा खुराक द्यायचा मंजी आमी समद्यानी उपाशीच ऱ्हायला पायजे."
 मग नकुसा काही बोलली नाही. बघता बघता तिची तब्बेत पुन्हा बिघडली. अमुक दुखतंय असं तिला सांगता येईना, पण काही तरी होत होतं एवढं खरं, अंगात बळच नव्हतं. हळूहळू रानातलं काम बंदच झालं, पण घरातलंही होईना. त्यातच तिला नीट चालता येईनासं झालं. पाय ओढीत ओढीत कशीबशी चालायची. वस्तीवरली माणसं म्हणायला लागली, "दशरथ, तिला चांगल्या डाक्टरला दाव. तिच्या अंगावरनं वारं गेलंय जनू" शेवटी लोकांच्या आग्रहाने का होईना, त्यानं तिला सायकलवर घालून डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनं बऱ्याच तपासण्या केल्या, शेवटी म्हणाला, तिच्या पाठीच्या कण्याला काहीतरी झालंय. पुण्याला नेऊन दाखवलं पाहिजे. आता तिला पुण्याला घेऊन कोण जायचं, म्हणून दशरथनं तिला तशीच घरी आणली. पण ती बरी व्हायची काही लक्षणं दिसेनात. उलट तिला आता आधाराशिवाय चालता येईनासं झालं. शेवटी दशरथनं मालकाकडून उचल घेऊन तिला पुण्याला नेलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले तिच्या मणक्यावर गाठ आहे. ती ऑपरेशन करून काढली पाहिजे. नकुसाचं ऑपरेशन झालं. पण तिच्या परिस्थितीत काही फरक पडला नाही. मग डॉक्टर म्हणाले, "तुम्ही फार उशीर केला. तिला लवकर आणली असती तर ती बरी होऊ शकली असती."

 दशरथने तिला घरी परत आणलं. आता तिचा कमरेखालचा भाग संपूर्ण लुळा पडला होता. तिला उठून बसता येईना की खुरडत चालता येईना. दशरथ तिला तिच्या बापाकडे घेऊन गेला. म्हणाला, "तिला तुमच्याकडं ठिवा थोडं दीस."

॥अर्धुक॥
॥२८॥