Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एस्टीनं ती पोती आणताना, छकडा करून घरी आणून टाकताना तो अभिमानाने फुललेला असायचा. पोती उतरवून घेऊन घरात आणून ठेवली की तो आणि नकुसा जमीनदाराच्या थाटात वावरायचे.
 तेवढा दाणा घरी खायला ठेवला असता तर थोडी तरी बेगमी झाली असती. पण कसल्या तरी नडीपोटी ज्वारी विकायची, असं करीत लवकरच ती संपून जायची. परत उपासमार सुरू व्हायची.
 एकदाच कधी तरी सणाला मुलांना कपडे घ्यायला नकुसानं बापाकडे पैसे मागितले, ते सुद्धा उसने, तर त्यानं आपली परिस्थिती किती बिकट आहे ह्याचं इतकं रडगाणं लावलं की तिनं पुन्हा बापाच्या दारात जायचं नाही म्हणून कानाला खडा लावून घेतला.
 बापाचंही बरोबर होतं. त्याच्या नव्या बायकोला एकीपाठोपाठ एक अशा दोन मुली झाल्या. त्यांच्या पाठीवर मुलगा. मुलांना संभाळायला दुसरं कुणी नव्हतं म्हणून ती कामाला जात नसे. पुन्हा ती तरुण बायको म्हणून तिची थोडी हौसमौज करावीच लागे. जमिनीच उत्पन्न काही ह्या सगळ्या गरजा भागवण्यापुरेसं नव्हतं तेव्हा वयानुसार झेपत नसून सुद्धा त्याला मजुरी करावी लागायची. त्यात तो आणखी मुलीला मदत काय करणार? त्यातून त्याची बायको जवळजवळ आपल्याएवढ्या सावत्र मुलीला पाण्यात पहायची. एवढंसं काही बापाघरून पोरीकडे गेलेलं तिच्या तीक्ष्ण नजरेला दिसलं की ती आकाशपाताळ एक करायची. दारात एक आंब्याचं झाड होतं. वर्षाआड त्याला भरपूर आंबे लागायचे. एकदा बापाने नकुसाकडे पाचपंचवीस आंबे दिले तर बायकोनं थयथयाट केला.
 "आपल्या पोरांच्या तोंडचा घास काढून तिची भर करता."
 "अगं, पर लय आंबं हायती, आपल्याच्यान् सरायचं न्हाईत. वाइच तिच्या बी पोरांला खाऊ दे की."
 "सरायचं न्हाईत तर बाजारला निऊन इकावं म्हन्ते मी. आपल्याला कंची बी नड नसल्यासारकंच वागताय तुमी बी."

 नकुसाला कसलासा आजार झाला. वरच्यावर ताप यायचा, अशक्तपणा वाटायचा. फारच आजारी झाली तर दशरथ तिला औषधाच्या दुकानातनं कसल्यातरी गोळ्या आणून द्यायचा. तेवढ्यापुरतं बरं वाटलं की ती उठून कामाला लागायची. एकदा ती फारच मागे लागली म्हणून तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरने तिला बरीच औषधं लिहून दिली. अंगात

॥अर्धुक॥
॥२७॥