पान:अर्धुक (Ardhuk).pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तो काही बोलला नाही, पण त्याला एकदम वाटलं, खरंच ही आईसारखी दिसते. तोच गोल चेहरा, तपकिरी डोळे, लहान चण आणि कपाळावर तशाच म्हाताऱ्या माणसासारख्या रेषा. तो आणि हेमा दिसायला वेगळेच होते. बापासारखे, त्याच्या मनात आलं. आईला विचारावंसं वाटलं पण त्यानं नाही विचारलं.
 उषा ज्यांच्याकडे काम करीत होती त्यांची दुसरीकडे बदली झाली. ती त्यांच्याबरोबर जायला तयार होती. पण इतक्या लांब परमलखात जायचं तिथे रहायला जागा कशी असेल, किती वर्ष तिथे रहावं लागेल हेही माहीत नसताना उगीच ह्या मुलीची जोखीम नको म्हणून त्यांनी तिला न्यायचं नाही असं ठरवलं.
 ती कायमची म्हणून घरी आली हे सावित्रीबाईंना आणि अरुणला मोठं संकटच वाटायला लागलं. ती नसताना आयुष्य कसं सुरळीत चाललं होतं. ती आल्यावर लगेच कुरबुरी, भांडणांना सुरुवात झाली. अरुणने आईला सांगितलं, "एक ती इथे राहील नाहीतर मी." शेवटी सावित्रीबाईंनी उषाला सांगितलं, "तु आपली दुसरीकडे खोली घेऊन रहा."
 "पण का?"  "तुला नीटपणे रहाता येत नाही. आम्हाला दोघांनाही त्याचा तापच होतो. काल तू त्या भीमाबाईशी भांडण केलंस."
 "मग, त्यांच्या बैलाच्या शेणाचा हा एवढा ढीग आहे.ते पावसानं भिजलंय तर त्याची कसली घाण मारते. सगळीच तक्रार करतात."
 "पण ती लगेच तुझं माझं करून भांडायला उठत नाहीत. तुझ्यापायी आम्हाला हाकलून देतील इथून."
 उषाच्या डोळ्यांत पाणी आलं. सावित्रीबाईंना तिची कीव आली पण तिच्या स्वभावाला औषध नव्हतं. मुख्य म्हणजे तिच्या तिथे असण्याचा अरुणला किती त्रास होत होता ते त्यांना दिसत होतं. आता कुठे तो रुळावर यायला लागला होता. अशात ताणतणाव सहन करणं त्याला धोक्याचं होऊ शकलं असतं.

 उषा घर सोडून गेली तरी ती येताजाता आईकडे डोकावून जायची. आईला भेटलं की तिला बरं वाटायचं. पण बाई तू कुठे रहातेस असं आईनं तिला कधी विचारलं नाही. एक दिवस ती गेली तो आई अंथरुणावर पडलेली.

॥अर्धुक॥
॥६॥