पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाऊन परिस्थितीला कारणीभूत असलेल्या रूढ कल्पना, चालीरीती, कुटुंबरचना ह्यांविरुध्द उभा राहत नाही. प्रत्येकजण आपली गोष्ट अपवादात्मक आहे, बाकीच्यांनी तसं वागण्याचं कारण नाही असंही सूचित करते.
 माहेरचा किंवा इतर कुणाचा आधार न घेता नवऱ्याला सोडून एकटी राहाणारी, बाईनं एकटं राहण्यातले धोके ओळखून उशाशी कुऱ्हाड आणि तिखटाची पूड घेऊन झोपणारी रुक्मिणी वटसावित्रीची पूजा करते. तिला विचारलं, "ही पूजा कशासाठी करतात माहिताय का तुला? हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून. तुला हवाय का हाच नवरा सात जन्म?" "नको बया, ह्याच जल्मी नको झालाया तर सात जल्म कशापाई?" पण म्हणून पूजा करायची, संक्रांतीचा वसा वसायची थांबणार नाही. एवढंच नव्हे तर तिची बहीण नवऱ्याकडे नांदत नाही आणि माहेरी येऊन राहिलीय तर ही तिच्यावर टीका करते. हिच्या मते बहिणीचा नवरा इतका काही वाईट माणूस नाही. ही म्हणते मी असते तर त्याच्यापाशी आनंदाने नांदले असते.
 आईबापांना दुसऱ्या कुणाचा आधार नाही म्हणून नवऱ्याला सोडून त्यांच्याजवळ येऊन राहणारी यमुना तिनं ज्याला नंतर नवरा मानला त्याला मुलगा देण्यासाठी स्वत:चा जीव आणि कुटुंबाचं आर्थिक-मानसिक स्वास्थ्य धोक्यात घालते. विधवा असून मुलांना घेऊन स्वत:च्या हिमतीवर एकटी राहाणारी आणि समाजाच्या टीकेचं लक्ष्य बनलेली सीता नवऱ्याबरोबर न नांदता वारंवार घरी पळून येऊन शेवटी दुसऱ्या एका माणसाबरोबर राहाणाऱ्या धाकट्या सावत्र बहिणीवर कडवट टीका करते. तिचं काय खुपत असेल, नवऱ्याघरचं सुरक्षित समाजमान्य आयुष्य सोडून, सगळ्यांच्या शिव्या खाऊन तिनं नवऱ्याला का सोडलं असेल ह्याचा विचार करण्याची तिला गरज भासत नाही.

 मार्गरेट वरवर पाहता दुर्दैवाची बळी ठरते, पण त्या दुर्दैवाला तिची मनोधारणा, तिचे निर्णय कारणीभूत ठरतात. दुसऱ्यांदा लग्नाचा निर्णय घेताना ती वयाने परिपक्व, व्यवसायात चांगली स्थिरस्थावर झालेली होती. तरीही तिनं अगदी थोड्या ओळखीवर लग्न करून नवऱ्याबरोबर जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर लवकरच त्याचं खरं स्वरूप तिच्यासमोर येऊनही ती त्याला धरून राहिली. तिच्या नवऱ्याच्या लग्नापासून आणि बायकोपासून

॥अर्धुक॥
॥१०४॥