पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठाम अपेक्षा होत्या. तिच्या अपेक्षा काय आहेत ह्याचा विचार करण्याची त्याला गरज भासली नाही किंवा असं म्हणता येईल की आपल्याला हवंय त्यापेक्षा वेगळं काही तिला हवं असेल ह्याची तो कल्पनाच करू शकत नव्हता. आपल्या उर्मी दाबून ठेवून, मनाचा कोंडमारा सहन करीत ती जोवर हसतमुखाने जगत होती तोवर ती सुखी आहे अशी कल्पना त्याला करून घेता येत होती. तो दुष्ट होता असं नाही, फक्त तिच्या बाबतीत संवेदनशुन्य होता. ती त्याच्या मनाप्रमाणे वागली की तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करी. ऐहिक दृष्टीने तिला तो काही उणे पडू देत नव्हता. फक्त तिला बौद्धिक गरजाही आहेत ह्याची तो दखल घेत नव्हता. हे सगळं स्पष्ट झाल्यावर मार्गरेटने ते सहन करून का घेतलं? अगदी परदेशातही तिच्यासारख्या शिकलेल्या, समर्थ बाईला काहीच हालचाल करता आली नाही हे पटत नाही. कुठेतरी ह्या पद्धतीने का होईना, संसारसुख अनुभवण्याची तिला आस होती. बाईपणाची तिची कल्पना शेवटी अगतिकतेचीच होती. माझ्या ओळखीची एक ब्रिटिश बाई आहे. तिनं तरुणपणी एक कार्यक्षेत्र निवडून फार उत्तम काम केलं आणि त्या क्षेत्रात जगभर नाव मिळवलं. जवळ जवळ चाळिशीला पोचल्यावर तिनं लग्न केलं. तिला विचारलं लग्नानंतर काय करणार, तर ती म्हणाली, बघू, काही वर्ष तरी नुसता घरसंसार पाहणार. म्हणजे कुठेतरी खोल मनात बाईनं लग्न केलं की तिला नुसतं गृहिणी होऊन राहण्याचा हक्क प्राप्त होतो अशी कल्पना रुजलेली आहे. ती अगतिक नसेल, पण संस्कारांनी सीमित आहे.

 ह्या पुस्तकातल्या स्वत:च्या परिस्थितीविरुद्ध बंड करणाऱ्या बायका ह्याच संस्कारांनी जखडलेल्या आहेत. माझ्यावर, माझ्यासारख्या अनेकजणींवर अशी वेळ का येते? हा आपल्या कुटुंबपद्धतीचा अटळ परिणाम आहे का? असल्यास ती झुगारून देण्याची किंवा तिच्यात काही फेरबदल करण्याची गरज आहे का? असे प्रश्न त्या विचारीत नाहीत. नवरा बऱ्यापैकी सुस्वभावी असेल, सासू फारसा जाच करीत नसेल, तर परंपरेने ठरवलेली भूमिका त्या सुखासमाधानाने बजावतील. अगदी नवऱ्यापेक्षा शिक्षण, बुद्धी, कर्तबगारी ह्यांत तसूभरही कमी नसलेल्या स्त्रिया सुद्धा कुटुंबात दुय्यम भूमिका निभावण्यात काही गैर मानीत नाहीत. ह्याचाच अर्थ असा की बहुसंख्य स्त्रिया आजही प्रचलित कुटुंबव्यवस्था, त्यातली त्यांच्या

॥अर्धुक॥
॥१०५॥