पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिलेल्या मुलीला कायमचं परत स्वीकारायला तयार नसतात. त्यातून मुलांची आई असलेलीबद्दल तर विचारायलाच नको. अशा परिस्थितीत मुलांना संभाळणं आणि नोकरी करून त्यांना पोसणं अशी दुहेरी जबाबदारी पेलण्याची तिची कुवत नसली तर नवऱ्याचं घर सोडण्याचा विचार तिनं करण्यात अर्थ नसतो. क्वचितच एखादी संगीता मुलांना सोडून पळून जाते. पण बहुतेक बायका आयुष्याला हार जातात कारण लहानपणापासून कधी त्यांना आपल्या हक्कांसाठी लढायचं बळच मिळालेलं नसतं. नकुसासारख्यांना तर हक्कांसाठीच काय, साध्या अस्तित्वासाठी सुद्धा झगडण्याचं बळ परिस्थितीने दिलेलं नसतं.
 स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल बोलताना एक विधान वारंवार केलं जातं आणि ते म्हणजे स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात. सासरच्या कुटुंबात प्रवेश केल्यावर वर्षानुवर्षे टक्के टोणपे सहन केलेली सासूच नव्याने त्या घरात येणाऱ्या सुनेचा सर्वात जास्त छळ करते. सासरी छळ होतो म्हणून माहेरी पळून आलेल्या मुलीचं परत जाण्यासाठी मन वळवण्यात आई पुढाकार घेते. असं का ह्याचं उत्तर खरं म्हणजे फार सरळ आहे. अशा वागण्यामागची मानसिकता पुरुषप्रधान समाजाने निर्माण केलेली आहे. पुरुष हा समाजाचा आणि कुटुंबाचा मुख्य घटक असतो आणि स्त्रियांच्या अस्तित्वाला फक्त पुरुषांच्या संदर्भातच अर्थ असतो. नवरा कसाही असला तरी तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो, आपला स्वामी असतो, आपल्याला आर्थिक, शारीरिक, भावनिक सुरक्षितता आणि समाजमान्यताही तोच मिळवून देतो हे बायकांच्या मनात खोलवर रुजलेलं असतं. नवऱ्याच्या खालोखाल महत्त्व असलेला पुरुष म्हणजे मुलगा. तरुण होईपर्यंत तरी त्याचं लालन-पालन करण्याबरोबरच ती त्याच्यावर अधिकारही गाजवू शकते. ह्या आपल्या अधिकाराला आव्हान देणारी, त्याच्या प्रेमात वाटेकरी बनणारी सून आली म्हणजे तिच्याकडे सासुने शत्रूत्वाच्या नजरेनं पाहणे हे ओघानेच येते. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात ह्याचा अर्थ एवढाच असतो की प्रचलित चौकट त्यांनी मनोमन स्वीकारलेली असते.

 ह्या संपूर्णपणे स्त्रीविन्मुख समाजात रूढीविरुद्ध आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या स्त्रिया असतात हीच दखल घेण्याजोगी बाब आहे. परंतु असह्य परिस्थितीविरुद्धचा त्यांचा लढा व्यक्तिविशिष्टच राहतो. त्यापलिकडे

॥अर्धुक॥
॥१०३॥