पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिवाय त्या लादल्या न जाता दोन माणसांतलं नातं टिकवण्यासाठी स्वेच्छेनं केल्या जातात. पण नवरा-बायकोच्या संसारात सुद्धा त्यांचा दृष्टिकोन पारंपरिक भूमिका स्वीकारण्याचा असला तर बाईच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. शारीरिक, मानसिक क्षमता पुरुषाइतकीच असूनही जर बाई कुचंबणा, मार सहन करीत राहिली तर ती आपल्या हक्कांपासून वंचितच राहणार.
 बाईच्या गौण भूमिकेचा मुख्य पाया म्हणजे तिचे आर्थिक परावलंबित्व. प्रचलित व्यवस्थेमधे कमाई करून कुटुंब पोसणे हे पुरुषाचे काम असते. बाई जरी मिळवती असली तरी ती प्रामुख्याने तिची जबाबदारी समजली जात नाही. ती मिळवती नसली तर ती घरी करते त्या कामाचं पैशात मोजमाप होत नाहीच, पण घरची जमीन असली आणि त्यावर ती उजाडल्यापासून मावळतीपर्यंत राबत असली तरी जमिनीची मालकी घरातल्या पुरुषांची असल्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांचेच असते. बाईला ना तिच्या कामाची मजुरी मिळते ना शेतमालाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशात वाटा. नोकरी करून पगार मिळवणारी बाई सुद्धा सर्व पगार बेहिशेबीपणाने कुटुंबावर खर्च करते. त्यातला काही स्वत:च्या भविष्याची तरतूद म्हणून बाजूला ठेवीत नाही. तेव्हा तिला नवऱ्यापासून फारकत घेण्याची पाळी आली तर ती अक्षरश: निष्कांचन अवस्थेत. बहुसंख्य बायका त्यांच्या मदतीसाठी केलेल्या कायद्यांचा आधार घेत नाहीत. त्यांनी घेऊ पाहिला तरी समाज त्यांना साथ देत नाही.

 नवऱ्याचं घर सोडून जाण्यातला आणखी एक अडसर म्हणजे मुलं. सहसा मुलं सोडून जाण्याची बाईची तयारी नसते. त्याला मुलांशी असलेली शारीरिक आणि भावनिक जवळीक हे कारण असतंच, पण पारंपरिक दृष्ट्या मुलं संभाळणं हे बाईचं काम मानलं जातं हेही असतं. पूर्णवेळ नोकरी करून मुलांची जबाबदारी इतरांवर सोपवणाऱ्या बायका सुद्धा समाजमन अजून पचवू शकलेलं नाही. मग मुलांची जबाबदारी झटकून त्यांना सोडून जाणाऱ्या बायका तर खलनायिकांच्या स्वरूपातच समाज पाहतो. सासरचे लोक सहसा मुलांवरचा हक्क सोडीत नाहीत. समजा सोडला आणि सासर सोडणारी बाई मुलांना घेऊन जाऊ शकली तरी अशा तऱ्हेचं पाऊल उचलताना तिला फार विचार करावा लागतो. आधी माहेरचे लोक लग्न करून

॥अर्धुक॥
॥१०२॥