पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो कुटुंबाला कलंक वगैरे आहे असं समजलं जात नाही. तरी सुद्धा आईबापांच्या मागे भाऊ अशा बहिणीची जबाबदारी घेईल ह्याची काही शाश्वती नसते तेव्हा शेवटी ती एकटीच पडण्याची शक्यता असते. ह्यामुळे सासरी मिळणारी वागणूक असह्यच झाली तर बाई सासरचं घर सोडायला तयार होते, कारण तिथे तिला इतर कसला नसला तरी जीव जगवण्यापुरतं अन्न, लाज राखण्यापुरतं वस्त्र आणि डोक्यावर छप्पर एवढं मिळण्याचा तरी हक्क असतो. पण ह्याचा अर्थ ती तिथे फार सुखात जगते असा नाही.
 लहानपणापासून कितीही संस्कार झालेले असले तरी स्वत:ची पार्श्वभूमी, रहाणी, सवयी सगळं विसरून एका संपूर्ण नवीन वातावरणाचा स्वीकार करायचा, स्वत:चं मन आणि व्यक्तिमत्व मारून अनेकदा शारीरिक व मानसिक छळ सहन करीत जगायचं हे कुठल्याच बाईला फारसं सुखावह असणं शक्य नाही. तिनं सहनशील असणं हे ह्या कुटुंबव्यवस्थेचं गृहीत आहे. माझी बायको फार समजूतदार आणि सहनशील होती म्हणून माझा संसार निभावला असं म्हणणारे किंवा मनोमन समजलेले पुष्कळ पुरुष असतात. पण ही सहनशीलता तिनं आणि तिनंच का दाखवायची, कोणत्या मर्यादेपर्यंत दाखवायची असे प्रश्र कुणी विचारीत नाही. एका मर्यादेपलिकडे तिनं सहन करायला नकार दिला तर ती आदर्श स्त्रीत्वाच्या कल्पनेला तडा देणारी, कुटुंबाचं स्वास्थ धुळीला मिळवणारी, कुटुंबसंस्थाच मोडकळीला आणणारी ठरते. हा मानसिक ढाचा जोवर कायम आहे तोवर स्त्रीला पुरुषप्रधान एकत्र कुटुंबव्यवस्थेत न्याय मिळण्याची शक्यता नाही.
 एकत्र राहण्याचा, त्यातूनही 'कायमचं' नातं जोडून एकत्र राहण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वानाच तडजोडी कराव्या लागतात. बाईची कुचंबणा जी होते ती केवळ तडजोडी कराव्या लागल्यामुळे, काही बाबतीत स्वत:च्या इच्छेविरुद्ध वागावे लागल्यामुळे होते असं नाही. एका अत्यंत असमान नात्यात अन्याय्य पद्धतीने तडजोडी लादल्या गेल्यामुळे होते. एकत्र कुटुंबात ती हतबल असते कारण ही एक विरुद्ध अनेक अशी लढाई असते.

 विभक्त कुटुंबात नवरा-बायकोचं नातं जास्त समान असू शकतं. ती कौटुंबिक निर्णयप्रक्रियेत भाग घेऊ शकते आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या दबावक्षेत्राबाहेर असल्यामुळे काही तडजोडी स्वीकारायला कमीपणा वाटत नाही. तडजोडी दोन्ही बाजूंनी झाल्या म्हणजे दोघांनाही जास्त सह्य होतात,

॥अर्धुक॥
॥१०१॥