पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ह्यापुस्तकातल्या बायका कधी ना कधी माझ्या ओळखीच्या झाल्या. काही माझ्या आयुष्याचा भाग बनून राहिल्या होत्या किंवा आहेत. काही बराच काळ माझ्या जाणिवेच्या परिघावर राहिल्या, तर काही थोडाच काळ माझ्या जीवनाला नुसता स्पर्श करून मग लांब गेल्या. त्यांच्या हकिगती लिहिताना काही संदर्भ मी बदलले आहेत, काही ठिकाणी मोकळ्या जागा ऐकीव माहितीवरून, क्वचित कल्पनेनं सुद्धा भरल्या आहेत. ह्या स्त्रियांची चरित्रं लिहिण्याचा माझा हेतू नाही. त्या सगळ्या खऱ्याच आहेत, पण त्यांच्या गोष्टी शंभर टक्के वास्तवाला धरून लिहिलेल्या नाहीत. इथे बारीक सारीक तपशील ही महत्त्वाची बाब नाही. महत्त्वाचं आहे आणि पूर्णपणे वास्तवाला धरून आहे ते म्हणजे केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून त्यांच्यापुढे उभ्या राहिलेल्या समस्या, संकटे आणि त्यांतून आपापल्या परिस्थिती आणि स्वभावानुसार त्यांनी काढलेले मार्ग.

 त्यांच्या समस्या ह्या मुख्यत्वाने पितृसत्ताक, पुरुषप्रधान कुटुंब आणि समाजव्यवस्थेतून, आणि त्यातील त्यांच्या दुय्यम स्थानामुळे उद्भवलेल्या आहेत. लग्न हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचे अटळ ध्येय असते आणि त्याचा परिणाम म्हणजे तिने आपल्या पूर्वायुष्याशी संपूर्ण फारकत घेऊन एका परक्या कुटुंबाचा घटक बनायचं. बाईची गौण भूमिका, तिला दिली जाणारी वागणूक आणि तिच्याबद्दलचा कुटुंबाचा आणि समाजाचा एकूणच दृष्टिकोन ह्या गृहीताशी निगडित आहे. मुलगी जन्मल्यापासून तिचं लग्न करून देणं हे आपलं परम कर्तव्य समजून आईबाप तिला दुसऱ्याची ठेव म्हणून वाढवतात. इथपासूनच तिचं त्या कुटुंबातलं गौण स्थान अधोरेखित होतं. तिला त्या कुटुंबात कोणतेही हक्क नसतात. एकदा सासरी गेली की ती माहेरच्या कुटुंबाचा घटक राहत नाही. सासरी पटलं नाही आणि ती माहेरी परत आली तर शक्यतो काहीतरी तडजोड करून तिची परत पाठवणी होते. मुलीला सासरी न नांदायला पुरेसं सबळ कारण आहे असं पटलं तर मध्यमवर्गीयांपेक्षा कष्टकरी वर्गातल्या आईबापांची तिला ठेवून घ्यायची जास्त तयारी असते असं मी पाहिलं आहे. कदाचित ह्याचं एक कारण असं असू शकेल की ती शेतमजुरी करून पोटाला मिळवू शकते तेव्हा तिचा कुटुंबाला भार होत नाही. आणखी एक कारण असं असू शकेल की अशा न नांदणाऱ्या आणि नांदवल्या न जाणाऱ्या मुलींची संख्या इतकी असते की

॥अर्धुक॥
॥१००॥