पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकसंख्या विकसित राष्ट्रात आहे व एकूण जागतिक संपत्तीपैकी ८० टक्के संपत्ती यात राष्ट्रांत आहे.
 याउलट अविकसित प्रदेशांत एकूण लोकसंख्येपैकी ७७ टक्के लोक असून केवळ जागतिक साधनसंपत्तीच्या २० टक्के संपत्ती या राष्ट्रात आहे. तसेच प्रत्येक राष्ट्रातील आर्थिक स्थितीही भिन्न आहे. विकसित राष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या दहा ते १५ टक्के लोक गरीब आहेत. तर अविकसित राष्ट्रात एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के लोक सधन आहेत. गेल्या वीस वर्षांत (१९७० ते ९०) अविकसित राष्ट्रातील लोकसंख्या ५५ टक्क्याने तर विकसित राष्ट्रात केवळ पंधरा टक्क्यांनी वाढली. ही तफावत पुढील काळातही राहणार असून सन २०२५ मध्ये जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे ८४ टक्के लोकसंख्या अविकसित राष्ट्रात असेल.
 लोकसंख्येच्या गेल्या काही शतकांत झालेल्या वाढीमुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. याचा प्रभाव अविकसित राष्ट्रात आपल्याला अधिक दिसून येतो. अठराव्या शतकानंतर मानवाने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली व कृषी औद्योगिक क्रांती घडवून आणली. लोकसंख्या विस्फोटाचे महत्त्वाचे कारण म्हणजे मृत्यू प्रमाणात झालेली घट होय. या सर्वांचा पडलेला पर्यावरणावरील परिणाम आपण बघूया. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष देणे तेवढेच आवश्यक आहे.

लोकसंख्येतील अतिवाढ व पर्यावरण
 लोकसंख्येची जसजशी वाढ होत जाते तसतशी लोकांची मागणी वाढत जाते. म्हणजेच त्यांच्या गरजांमध्ये वाढ होत राहते. वस्तू आणि सेवांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम नैसर्गिक संपत्तीवर होईल. नैसर्गिक संपत्तीचा अतिप्रमाणावर वापर केला जाईल. त्यामुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होईल. जास्त लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील त्याज्य पदार्थांचा साठा अधिक वाढून लोकांचे आरोग्य बिघडेल. तसेच पृथ्वीची पोषण क्षमता कमी होईल.

 पृथ्वीवर दबाव वाढून वाढत्या लोकसंख्येच्या पोषणासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली जाईल. बिगर शेतजमिनी शेतीसाठी जास्त प्रमाणात वापरल्या जातील. भू-वापर प्रारूपात विलक्षण बदल होईल. त्यामुळे भूमीची अवनती होऊन निर्वणीकरण, जलसंपत्तीचे रितेपण, नैसर्गिक जीवांचा ऱ्हास इत्यादी घडून येईल.

अर्थाच्या अवती-भवती । ९१