पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतातील पंचवार्षिक योजनांतर्गत औद्योगिक
विकास व त्यातील रचनात्मक बदल


 मागच्या चाळीस वर्षांपासून योजनांतर्गत झालेल्या औद्योगिक विकासात अनेक रचनात्मक बदल करण्यात आले तरी औद्योगिक विकासाची गती समाधानकारक नाही.
 पहिल्या पंचवार्षिक योजनेत उद्योगांना विशेष महत्त्व दिले गेले नव्हते. तरी उद्योगांची एकूण प्रगती समाधानकारक होती. औद्योगिक उत्पादनांच्या वाढीत क्रमबद्धता होती. पाच वर्षांत ४० टक्के यात वाढ झाली. असे सहज म्हणता येईल की, कृषी उत्पादनात तूट असताना, औद्योगिक क्षेत्रांचा विकास अधिक झाला असता. पण, औद्योगिक क्षेत्र दुर्लक्षित राहिले. कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास एकत्र होऊ शकेल असा आराखडा तयार करायला हवा होता. तेव्हाच अनेक गुंतागुंतीच्या समस्या कमी होऊ शकल्या असत्या. आपल्यासारख्या अल्पविकसित देशांमध्ये बचतीला योग्य गुंतवणुकीच्या साधनांमध्ये परिवर्तित करता आले नाही. औद्योगिक रचनेतील ही खरी अडचण होती. याच्याकडे आयोगाचे दुर्लक्ष झाले. भविष्यात संरचनात्मक सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता पहिल्या योजनेत काही नवीन आधारभूत उद्योग सुरू करण्यात आले. हेही एक महत्त्वाचे पाऊल होते. या काळात औषधी, खते, मशीन निर्माण, रेल्वेचे डबे, अवजारे यासारख्या महत्त्वपूर्ण उद्योगांची स्थापना झाली.

Photo source:industrailpolicy.in

अर्थाच्या अवती-भवती । ७०