पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले आहे. विदेशी कंपन्याही यात गुंतवणूक करत असल्याने या क्षेत्राकडे सातत्याने बारकाईने लक्ष देण्याची गरज राहिल. नाही तर मंदीच्या काळात उद्योग भांडवली बाजार बळकट होऊ शकणार नाही. संरचनात्मक विकासाला वेग देण्याकरिता प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. तसेही या दशकात त्याला सतत प्राधान्य दिले जात आहे. लोकांनी अल्प बचत वाढवावी आणि त्याचा उपयोग या क्षेत्रात गुंतवणुकीकरता होऊ शकेल म्हणून युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या योजनांमध्ये (यु.एस.६४) करमाफी करण्याची योजना आहे. मंदीच्या स्थितीला बघता असे अधिक प्रेरणात्मक धोरण आखण्याची गरज आहे. मोठ्या व मध्यम उद्योगाकरिता ‘सरकार दिल से' मदत करणार आहे, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले आहे.

सुवर्ण जमा योजना
 आपल्या देशात बऱ्याच घरांमध्ये व धार्मिक संस्थांमध्ये सोन्याचा साठा आहे. त्यातून उत्पन्ननिर्मिती होत नाही. आपल्याला दरवर्षी सुवर्णाची नवीन मागणी पूर्ण करण्याकरिता कितीतरी कोटी रुपयांचा विदेशी विनिमय खर्च करावा लागतो. त्यामुळे सुवर्णाच्या साठ्याला उपयोगात आणण्याकरिता नवीन सुवर्ण जमा योजना श्री. सिन्हा यांनी सुचविली आहे. ही स्वागतार्थ आहे. ही योजना उत्पन्न देणारी ठरू शकेल आणि आयातीत सुवर्णाची गरज कमी होईल. या जमाराशीच्या सर्टिफिकेटवर उत्पन्न कर व संपत्ती करातून सूट मिळत असल्याने लोक याकडे प्रवृत्त होण्याची शक्यता आहे.

 प्रश्न असा उभा राहतो यात फायदा कसा व कोणाचा? विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, लोकांनी ही योजना स्वीकारल्यास वर्षभरात त्यांना याचा फायदा दिसायला लागेल. त्यामुळे अधिकोषांमध्ये लॉकरची मागणी घटेल. अधिकोषांचा एक ठराविक उत्पन्नाचा हिस्सा कमी होईल.(लॉकर्सवरील जमाराशी व दरवर्षीचे उत्पन्न) हा भाग सोडला तर लोकांच्या हातात क्रयशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने या मृत गुंतवणुकीला जागृत करणे आवश्यक होते. मंदीच्या काळात लोकांच्या हाती पैसा देऊन प्रेरणा निर्माण करणे हे महत्त्वाचे ठरत असते. त्यातून मागणी वाढली पाहिजे हा एक भाग व बचत वाढवून सरकारला गुंतवणुकीला वाव मिळणे हा दुसरा भाग. असे दोन्ही भाग विचारात घेणे आवश्यक असते. त्यानुसार या अर्थसंकल्पात करण्याचा प्रयत्न झाला आहे.

अर्थाच्या अवती-भवती । ६७