पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तुत कंपनीद्वारे पिअरलेस या प्रसिद्ध गैरसरकारी वित्तीय संस्थेची मदत हे होय. पिअरलेस या कंपनीचा ग्रामीण भागातील प्रभाव लक्षात घेऊन रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीने ही अभिनव योजना आखली आहे व याचे यशापयश नजिकच्या काळात कळेलच. हा प्रयोग यशस्वी झाला तर आणखी बऱ्याच कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे असेच अभिनव मार्ग शोधून काढतील यात शंका नाही.
 १२. समभागांचे भाव बाजारात टिकून राहावेत, म्हणून भागधारकांची दिशाभूल करणे हा प्रकार भारतातच नव्हे तर जागतिक भांडवल बाजारपेठेतही होत असतो. यात नावीन्य काही नाही. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात भांडवल- उभारणीच्या वेळेस तसेच लाभांश जाहीर करताना ताळेबंदात जे घोटाळे होतात ते निश्चितच चिंताजनक होय. इंडिया पॉलीफाइबर्स आणि वर्ल्ड लीक फायनान्स या दोन कंपन्यांच्या भागधारकांच्या बाबतीत जे घडले तेही तितकेच चिंताजनक आहे. इंडिया पॉलीफाइबर्स या कंपनीच्या नावाने बनावट कंपनी वृत्त आणि खोटी आकडेवारी प्रसिद्ध करून काही लोकांनी तत्कालीन भाववाढीचा फायदा घेतला. लिंक फायनान्स या लीजिंग कंपनीच्या प्रमुख संचालकाने भागधारकांचे एकशे पाच कोटी रुपये बुडविले. या व अशाच छोट्या मोठ्या घटना भारतीय तसेच अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण करतात.
उपसंहार
 वर उल्लेखिल्याप्रमाणे भांडवल बाजाराचे आजचे स्वरूप जरी थोडे गोंधळाचे व अस्थिरतेचे असले तरी निराशाजनक निश्चितच नाही. औद्योगिक वाढीस सरकारचा ठाम पाठिंबा व त्यानुसार होणारे औद्योगिक धोरणातील बदल हे याचे द्योतक आहे. प्रमुख महानगरांत शिवाय इतर मोठ्या शहरांमध्येही स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याचाही सरकारचा मनोदय आहे. ऑड-लॉट शेअर्सच्या खरेदी-विक्रीकरिता दर शनिवारी एक विशेष सत्र आयोजित करण्यात येते. तसेच सरकारी कर्जरोख्यांची तरलता वाढावी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रमुख शहरांमध्ये काऊंटर खरेदी-विक्री केंद्र सुरू केली आहेत. तसेच स्टॉक एक्सचेंजच्या सभासदांची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे. सरकारी वित्तीय संस्थांच्या खरेदी-विक्रीमध्ये जर सुसूत्रता आली तर त्या निश्चितच जास्त परिणामकारकरित्या कार्य बजावू शकतील. सार्वजनिक बँकांच्या म्युच्युअल फंडस्च्या अल्पकालीन लाभांकडे लक्ष केंद्रित न करता भाग- भांडवल बाजाराच्या दीर्घकालीन स्थिरतेचा विचार करून कार्य केले तर भारतीय

भागभांडवल बाजाराचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल राहील यात शंका नाही.

अर्थाच्या अवती-भवती । ३९