पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विदर्भात कृषी विकास
आणि पाण्याचे व्यवस्थापन


 कृषी विकासाकरिता पाणी हे किती महत्त्वाचे संसाधन आहे ह्याची सर्वांनाच चांगली कल्पना आहे. ते कृषीच्या कार्याकरिता कितपत योग्य प्रकारे वापरता येईल, पाण्याचे व्यवस्थापन कसे केलेले आहे यावर अवलंबून असते. २१ व्या शतकात पाण्याची उपयोगिता, वापर यावर भर देण्याची गरज राहील. त्यातून कृषी क्षेत्राला सिंचनातून विकसित करणे निर्णायक ठरेल. कारण हळूहळू पाण्याची कमतरता दिसून येत असल्याने प्रत्येक क्षेत्रीय पातळीवर नियोजन करुन कृषी कार्यात सुधारणा करणे अपेक्षितच आहे.
 संपूर्ण विदर्भात तापी आणि गोदावरी या दोन प्रमुख नद्यांतून पाणीपुरवठा होतो. तापी नदीच्या खोऱ्यातून २१ टक्के आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यातून ७९ टक्के पाण्याचे वाटप होते. संपूर्ण विदर्भात पाण्याची कमतरता नाही. पावसाच्या पाण्यातून फक्त बुलडाणा तालुका वंचित राहतो. त्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. इतरत्र भरपूर पाऊस असतो. येथील लोकसंख्या आणि सिंचनाची गरज पाहता या दोन्ही नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप असमतोल प्रकाराचे आहे. तापी नदीच्या पुनी उपखोऱ्यामध्ये अधिक लक्ष दिल्यास तेथून पाणीपुरवठा अधिक होऊ शकतो. बऱ्याच मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनात वाढ होऊ शकते.

Photo source: www.hindustant imes.com

अर्थाच्या अवती-भवती । १२७