पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसू लागले. रोजगारात असणाऱ्या अस्थिरतेचा विचार निरक्षर, अडाणी ग्रामीण जनता करत असल्याने ते शहरी क्षेत्राकडे धाव घेतात. असेच तिथे घडले. स्थलांतरण कायम स्वरूपाचे होऊ लागले. ग्रामीण-शहरी अंतर व श्रीमंत- गरीबातील तफावत साधारणपणे ४.५-५ टक्क्यांनी वाढली.
 १९९० सालापासून कृषी व्यवस्थेत उतार आलेला आहे. मानविय दृष्टीकोन व पर्यावरणीय बदल ह्या दोन्ही बाबी ह्याला जबाबदार आहेत. मोसमी लहरीपणा ह्या क्षेत्रासाठी काही नवीन नाही. पण मान्सूनचा अधिक लहरीपणा ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सदैव अस्थिरता निर्माण करणारा आहे. यांना दररोजच्या मिळकतीसाठी अनेक समस्यांमधून जावे लागते. त्यामुळे शहरांमध्ये अधिक आशय आहे, असे काही उदाहरणांवरून लक्षात येते. शहरी कामामध्ये दर दिवसाची रोजी काही दिवस नियमितपणे मिळते. त्यामुळे रोजगारासाठी रोजची ओढाताण कमी होईल असे त्यांना वाढते. ग्रामीण क्षेत्रातच अशी काही कामे त्यांना मिळवून दिल्यास शहरी क्षेत्राकडे जाण्याची ओढ कमी होईल. एका सर्वेक्षणानुसार १० टक्के स्थलांतरीत झालेले ग्रामीण लोक परत आपल्या जुन्या आवारात परत आले तरी हा अलोट ओघ चालू राहील व फायद्याचा ठरेल. त्यांना मात्र तिथेच काम मिळून देण्याची गरज आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी पुढील योजनांवर अधिक भर देण्याची गरज आहे.

महिलांचा वाढता वाटा

 अस्थिरता हे असंघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. त्यात महिलांना असंघटित क्षेत्रात अधिक काम करावे लागते. असे भारतात अनेक भागामध्ये दिसून येत आहे. कमी पगारावर काम करण्यास स्त्रिया तयार होतात. त्याची अनेक सामाजिक व आर्थिक कारणे आहेत. जशी कृषीक्षेत्राची सध्या पीछेहाट सुरु आहे. नैसर्गिक लहरीपणामुळे ग्रामीण जनतेला सदैव मिळकत आणि राहणीमानाबाबत अस्थिरतेला तोंड द्यावे लागते. या समस्येस तोंड देण्यासाठी पुरुषाच्या दुप्पट संख्येने ग्रामीण भागातील महिला सीमांत कामगार म्हणून कामे करतात. शेतीतून मिळणारे उत्पन्न किती अपुरे आहे. तेच यातून दिसून येते.

 निरक्षरता हे एक मोठे कारण असून महिलांची संख्या छोटे व सीमांत मजूर म्हणून अधिक वाढत आहे. शेतमजूरांची संख्या ८३,१३,२२३ होती. ती छोटे आणि सीमांत शेतकरी यांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. दुष्काळाच्या काळात येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी रोजगार हमी योजनेवर शेतमजूर म्हणून नावे नोंदविणाऱ्यांची संख्या ४५,१८७९४ होती. पैकी २१,४६,५६० महिला होत्या. त्यापैकी ९२.३ टक्के महिला निरक्षर होत्या.

अर्थाच्या अवती-भवती । १२३