पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गृहनिर्माण ह्यात रोजगार व उत्पादन वाढलेले आहे. पण किरकोळ व्यापारात, रोजगारात होणारी वाढ अधिक आढळते. उत्पादनाच्या क्षेत्रातील हे प्रमाण २४ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर घसरले, तर व्यापार क्षेत्रात ते ४१ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले. म्हणजेच आपल्या राज्याचा उत्पादन रोजगार कमी होऊन व्यापार रोजगार वाढल्याची काही करणे असू शकतात.
 १. इतर राज्यातून वस्तुंची आवक पूर्वीपेक्षा वाढली आहे. साधारणपणे ती ५-६ टक्क्यांनी वाढली आहे.
 २. विदेशी वस्तुंची आवक वाढत असून महानगरांमध्ये सर्वाधिक वाढणाऱ्या वस्तू दैनंदिन व्यवहारातील आहेत. परिणामतः काही गृहउद्योगावर त्याचा परिणाम विपरीत झाल्याने उद्योग, उत्पादन व रोजगार बंद झालेले आहेत. ग्रामीण क्षेत्रात याबाबत झळ पोहोचणे सुरु झाले आहे.
 ३. एकूण रोजगारात वाढ खुंटल्याने बरीच औद्योगिक उत्पादने बंद पडल्याने वस्तूची मागणीही कमी झाली आणि उत्पादन क्षेत्रावर विपरीत परिणाम पडला आहे.
 ह्या व्यतिरिक्त व्यावसायिक शिक्षणाचा अभाव, गुंतवणीसाठी भांडवलाची अडचण, खुल्या बाजाराच्या पद्धतीत काही परंपरागत उद्योग समाप्त होणे इत्यादी कारणे असू शकतात.
 १९९०-१९९८ हा काळ स्वयंरोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरला. असंघटित क्षेत्र वाढीस हा काळ जबाबदार ठरला. कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रातातून हा रोजगार निर्माण झालेला आहे. राज्याच्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये घरा-घरातून उद्योग सुरु करण्याच्या कल्पनेला प्राधान्य देण्यात आले. परिणामी, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद (काही प्रमाणात) ही शहरे रोजगार विकासाची केंद्रे ठरली. रोजगाराच्या संधी दरवर्षी १.६ टक्के या दराने वाढल्या. त्यात करार पद्धतीचा समावेश असल्याने बहुसंख्य क्षेत्र असंघटित होते. कमी उत्पन्न, अधिक तास काम, कामाची अस्थिरता, आणि बेरोजगारी ही या क्षेत्राची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे नोकरीमध्ये असणारी व्यक्ती अस्थिर उत्पनाचे जीवन जगत होती.

बिगरशेती क्षेत्रात वाढ

 पश्चिम महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रात वाढ झाली. हे बिगर शेती क्षेत्र असून तिथे समृद्धी निर्माण झालेली दिसते. ह्या समृद्धीचे विश्लेषण असे करता येईल. जेव्हा एका क्षेत्राची समृद्धी होत असते तेव्हा त्याचे काही उपपरिणाम दिसून येत असतात. ग्रामीण क्षेत्रातील लोकांचे शहरी क्षेत्राकडे वाढते आकर्षण बरेच

अर्थाच्या अवती-भवती । १२२