पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतीवरदेखील परंपरागत पद्धतीने कार्य न करता तो कसा उत्तम करता येईल हे बघणे आवश्यक आहे. ग्रामोद्योग, लघुउद्योग, कुटिर उद्योग स्थापित करण्याकरिता प्रेरणेची गरज आहे. तेव्हाच व्यक्तीच्या स्थानिक मनोवृत्तीत बदल घडून येईल. एकदा यादृष्टीने विचार व्हायला लागला की, बरीच जनजागृती होईल, असे सामाजिक दृष्टिकोनातून मांडता येईल. या सर्व बाबींबरोबर सरकार, सहकारी संस्था व इतर संस्थांकडून वित्तपुरवठा, यासंबंधी मदत मिळणे व त्यात वाढ होणे उत्साहवर्धक ठरेल. म्हणून बँकिंग व्यवस्था सदृढ व्हायला हवी.
 या क्षेत्रात कृषी हा प्रमुख व्यवसाय असून कृषीवर आधारित उद्योगांची स्थापना होऊ शकली नाही किंवा कृषीला समृद्ध करणारी साधने निर्माण करता आलेली नाहीत. कल्पकतेला वाव मिळालेला नाही. देशातील बहुतेक (९०%) युवक पश्चिम महाराष्ट्राकडे धाव घेतात. देशाच्या मध्ये असलेला हा भाग तर सर्वांना आकर्षित करणारा ठरू शकतो. पूर्वी मध्यप्रदेशातून याचे झालेले विभागीकरण काही प्रमाणात याच अल्पविकासाकरिता कारणीभूत ठरू शकते. विदर्भ हा मध्यप्रदेशाचा भूभाग असताना नागपूर शहराला गौरवाचे स्थान प्राप्त होते; पण महाराष्ट्रात विदर्भ समाविष्ट झाल्याने मुंबईलाच तो मान मिळत राहिला. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ झाल्याने त्या क्षेत्राचा पहिल्यापेक्षा अधिक विकास झाला आहे. मध्यप्रदेशाची स्थिती ही विदर्भासारखीच होती. मात्र आता तेथे विकास झाला आहे.
 चंद्रपूर, भंडारा या भागांमध्ये पेपर मिल्स, प्लायवूड, सिमेंट उद्योगांची स्थापना झाली आहे. तेथील नैसर्गिक संपदा बघता बऱ्याच लघुउद्योगांची स्थापना होण्याची शक्यता तिथे आहे. या उद्योगांचा स्वतंत्र विकास करणे आवश्यक आहे. जिथे उत्तम स्थानिक कच्चामाल सहज उपलब्ध होऊ शकतो तिथे जे उद्योग स्थापित झाले त्यांना सहाय्यक उद्योगांचा दर्जा मिळू शकतो. स्वतंत्रपणे या उद्योगात रोजगारात वाढ होऊ शकत नाही.
 नागपूर जिल्ह्यात लघु उद्योगांच्या विकासात असे अनेक अडथळे आले आहेत. स्थानिक कच्चामाल असूनही संबंधित उद्योगांना वाव मिळाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना वित्तपुरवठा बराच उशीरा उपलब्ध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वित्त निगमाने दरवेळेस उशीरा वित्तपुरवठा दिल्याने ९० टक्के तरी उद्योग बंद पडले आहेत. सर्वात वाईट म्हणजे युवापिढीला तूप- रोटीकरिता मारामार करावी लागत आहे.

 एक नवीन उत्साही युवक हे बघून उद्योग उघडण्याची हिंमत करीत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने ७० लाखांची धनराशी १९९० सालच्या आधी दिली. तरीही त्या उद्योगांची हीच स्थिती आहे. कमी शिक्षण आणि त्याचा

अर्थाच्या अवती-भवती । ११३