पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रमशक्तीनेही समृद्धी वाढविता येते. श्रमाच्या घटकांवर संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. सहकारी आणि सरकारी पातळीवर श्रमिक अशा सोई उभारून शेतीचे व्यवसायीकरण करू शकतो.
 दोन कोष्टके (क्र.१ व २) या शोधपत्रात जोडलेली आहेत. त्यावरून विदर्भात व महाराष्ट्रात आर्थिक बदल विभिन्न बाबींवर किती झाला हे सांगता येईल. सध्याची वर्तमान परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात विद्युत व्यवस्था १६५.० टक्के, तर विदर्भात ५४.३ टक्के आहे. तसेच राष्ट्रीय बृहद मार्गाची लांबी महाराष्ट्रात १.४६ टक्क्यांनी वाढलेली आहे, तर विदर्भात फक्त ०.१२ टक्क्यांनी वाढलेली आहे. रेल्वेच्या मार्गाचा वृद्धि दर ०.२६ टक्के महाराष्ट्रात आहे, तर विदर्भात ०.११ टक्के आहे. संचारव्यवस्था, अधिकोषव्यवस्था यातदेखील अशीच तफावत सापडते. विदर्भात आर्थिक विकासाकरिता येणाऱ्या अनेक अडथळ्यांना विचारात घेतले तर काही खालील बाबींवर विचार करणे आवश्यक आहे. कच्चा माल, व्यवस्थापन, वित्तपुरवठा व वाहतूक व्यवस्था सुधारता आली तरच लघुउद्योग व मध्यम प्रकारच्या उद्योगांना वाव मिळेल. स्वयंरोजगाराला वाव देण्याकरिता या समस्यांवर पहिल्यांदा मात करणे अधिक आवश्यक आहे. येथील श्रमिकांना (सर्वस्तरीय) वाव मिळाला तरच ते टिकून राहू शकतील आणि वस्तूच्या गुणवत्तेत वाढ होईल. स्पर्धा वाढली की, वस्तूंच्या गुणवत्तेत निश्चितच वृद्धी होणार.

 या क्षेत्रातील अधिकांश लोक कृषी अर्थव्यवस्थेत पिढ्यानपिढ्या रूळलेले आहेत. भारताच्या इतर क्षेत्रांप्रमाणे त्यांचा मुख्य व्यवसाय कृषी आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास कोणत्याही सामाजिक, राजनैतिक किंवा मानवीय कारणांमुळे झाला नसला तरी आजही येथे आर्थिक व नैसर्गिक संपदा औद्योगिक विकासाकरिता ज्या भागांमध्ये उपलब्ध आहे तिथेदेखील कृषी व्यवस्था रूढ झालेली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हे ही याची उदाहरणे आहेत. या क्षेत्रामध्ये भरपूर जंगले व इतर वनसंपदा, खनिज संपदा आहे. ती वनसंपदा राज्याच्या एकूण साठ्याच्या ७६ टक्के आहे. याच क्षेत्रामध्ये मॅगनीज, कोळसा, चुनखडी व अनेक बहुमूल्य धातू आहेत. ती राज्याच्या एकूण साठ्याच्या ८० टक्के आहे. फळबागांकरीता उत्तम शेतजमीन असून येथे संत्री, पपई, द्राक्ष यांसारखी फळे उत्तम प्रतीची आहेत. त्यांचे चांगल्या पद्धतीने व्यवसायीकरण करून या व्यापाराला चालना देण्याची क्षमता येथे आहे. हे सर्व घडवून आणण्याकरिता लोकांच्या स्वभावात, त्यांच्या विचारसरणीत व दृष्टिकोनात मूलभूत बदल व्हायलाच पाहिजे, तेव्हाच उद्योग, व्यापार, संचार इत्यादी व्यवसायांना वाव मिळेल.

अर्थाच्या अवती-भवती । ११२