पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमी दर्जा हीसुद्धा या क्षेत्राची एक उणीव आहे. शैक्षणिक क्षेत्रात उच्चतम शिक्षण घेण्याच्या सोई आणि त्या शिक्षणाला उच्च मान्यता मिळाली तरच येथील विद्वानांना वाव मिळू शकेल. आतापर्यंत कोणकोणत्या कारणांमुळे उद्योग आजारी झाले याची माहिती तालिका क्रमांक तीनमध्ये दिली आहे. येथील स्त्रियांकरिता काही सवलती उद्योग क्षेत्रात असल्या तर त्यांना विशेष वाव मिळेल. स्त्रियांना घरगुती स्तरावरउद्योग करता येतात. ते मोठ्या प्रमाणात वाढावेत. कारण पश्चिम महाराष्ट्राच्या अशा अनेक महिला उद्योजकांनी इथल्या बाजारावर कब्जा केलेला आहे.
 त्या वस्तू ज्या सहज तिथे उत्पादित होऊ शकतात त्या महागात घ्याव्या लागतात. याबाबतीत बऱ्याच जनजागृतीची आवश्यकता आहे. ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याकरिता विदर्भात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पंचायत समित्यांना जो सध्या वाव केंद्र सरकारने दिला आहे त्याचा उपयोग चांगल्याप्रकारे कसा करावा याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे एक प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, रोजगार देताना उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर अधिक भर द्यायला हवा. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील लोकांना शहरी क्षेत्राकडे धाव घेण्याची गरज पडणार नाही.
 वरील सर्व बाबींना स्पष्ट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नियोजन काळात सरकार क्षेत्रीय संतुलन स्थापित करण्याचा उद्देश अगदी आवर्जून प्राथमिक क्रमावर ठेवते आणि आर्थिक असमानता आणण्याची घोषणा करते. परंतु, अल्पविकसित क्षेत्राच्या विकासाकरिता जे काही आर्थिक सहाय्य उपलब्ध केले जात ते केव्हाही कोणत्याही कारणांतर्गत कमी करून टाकले जात. अशा कपातीत विदर्भाचाही नंबर लागतो. वरील संपूर्ण विश्लेषणावरून असा निष्कर्ष निघेल की, विदर्भातील व्यक्ती एका विशिष्ट चौकटीत राहणार आहे. त्यांनी स्पर्धात्मक जगाकडे बघावे. फक्त संयोजक होण्याकरिता प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे नाही, तर कलेला आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.

 एका स्वतंत्र वातावरणात हे करणे शक्य आहे. आपण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत बरेच मागासलेले आहोत, हे खरे तरी आपली उड्डाणाची वेळ ठरविणे हे आपल्या युवा पिढीच्या हातात आहे. संधीचा फायदा घेऊन आपण हातभार लावला पाहिजे. जो काही अन्याय झाला असे जे आपण म्हणतो त्याला पुरून उरले पाहिजे.

अर्थाच्या अवती-भवती । ११४