पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थेद्वारे जोडली जात नाही, तोपर्यंत या क्षेत्राची श्रमाची गतिशीलता वाढणार नाही. आणि भांडवलातही भर पडणार नाही. संचारव्यवस्था, शैक्षणिक संस्था व त्याचा स्तर त्यातही झपाट्याने वृद्धि होणे महत्त्वाचे आहे. संरचना बळकट असल्याने विकासात फार मोठ्या अडचणी येत नाहीत. म्हणून मुंबईमध्ये औद्योगिक क्षेत्र मर्यादित करणे किंवा विदर्भातील लोकांना प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त वाहतूक, दळणवळण, वीजव्यवस्था, पाणीपुरवठा इत्यादी संरचनेत वाढ करणे अधिक योग्य ठरेल. याबाबतीत केलेले चांगले नियोजन सर्वच क्षेत्रात चांगली प्रगती घडवून आणेल. आवश्यकते आणि क्षमतेप्रमाणे लघु व मध्यम उद्योगांची स्थापना, त्यांच्या गुणवत्तेत वाढ व शेतीचे व्यवसायिकरण करणे शक्य होईल. अशा चांगल्या दिशेने चक्र चालत राहण्याकरिता संरचनात्मक आराखडा पक्का करणे ही पहिली पायरी आहे. त्याने आपोआपच गरिबी आणि बेकारीला आळा बसतो.
 यवतमाळ व चंद्रपूर क्षेत्रांमध्ये उपलब्ध नैसर्गिक संपत्तीचे विदोहन करून आणखीन बृहत उद्योगांची स्थापना करणे शक्य आहे. त्यात कोळसा, सिमेंट, पोलाद व त्यासंबंधित उद्योग. एक दुर्भाग्याची बाब म्हणजे बुटी-बोरी (नागपूर) आणि पिंपरी (पुणे) या दोन्ही औद्योगिक वसाहतीची सुरुवात एकाच वेळेस करायची असे ठरले होते. परंतु, बुटी-बोरी प्रोजेक्ट अद्यापही उभारला गेला नाही. म्हणून नैसर्गिक साधनांबरोबर इतर मानवीय घटकांनी काम करणे महत्त्वाचे असते. म्हणून राजकीय व सामाजिक क्षेत्रेही तेवढीच महत्त्वाची आहेत.
 देशाच्या मध्यभागी विदर्भाचा भूभाग येत असल्याने देशाच्या प्रत्येक भागाशी संपर्क साधला जातो. हीदेखील विकास होण्याच्या दृष्टीने एक देणगी आहे. तरीही हे शक्य झाले नाही. त्याचे कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे आधारभूत संरचना नसणे हेच आहे. आधारभूत संरचना स्थापित न होण्यामागे राजकीय व आर्थिक दुर्लक्षितता कारणीभूत आहे. त्यामुळेच उद्योग, कृषी व व्यापारात विकास घडून आलेला नाही. जसे उद्योग व व्यापाराचे विकास होणे आवश्यक आहे. तसेच शेतीचे व्यापारीकरण करणे महत्त्वाचे आहे. विदर्भातील पिकांची प्रत आणि फळांचा दर्जा बघता अत्याधुनिक शेतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यात अर्थातच रोजगार वाढीकडे दुर्लक्ष व्हायला नको.

 पंजाबातील गव्हाच्या शेतीचे उदाहरण व माहिती विचारात घ्यायला हवी. तेथील शेतमजूर उन्हाळ्यात अतिशय तापत असल्याने, दुपारच्या कालावधीत जमीन न कसता रात्री जमीन कसण्याचे काम बल्ब व लाईटचा उपयोग करून करतात. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस त्यात वाया जाऊ नये अशी सोय त्यांनी केल्याने त्यांच्या समृद्धीत आणखीन भर पडली आहे. म्हणजे इतर सोयींबरोबर

अर्थाच्या अवती-भवती । १११