पान:अर्थाच्या अवती-भवती.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उत्पादनाच्या, विनिमयाच्या आणि वितरणाच्या क्षेत्रांत मनुष्य आपले निर्णय घेतो, असे स्मिथ समजत असे. 'अदृश्य हात' आणि 'स्वहित' या दोन मुख्य संकल्पनांच्या आधारे अर्थव्यवस्थेचे आपोआप नियंत्रण होते, असे स्मिथ समजत असत. अशी मुक्त अर्थव्यवस्थेची पद्धत ठेवल्यानंतरच हे शक्य आहे.
 मुक्त व्यापाराच्या पुरस्कर्त्या राष्ट्रांमध्ये ग्रेट ब्रिटन हे अग्रगण्य राष्ट्र आहे. जगातील बहुसंख्य राष्ट्रांचा विरोध आणि जागतिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही ग्रेट ब्रिटनने १९२० सालापर्यंत मुक्त अर्थव्यवस्था व त्यातील व्यापाराच्या व्रतात खंड पडू दिला नाही. इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच मुक्त व्यापाराचे आंदोलन सुरू झाले होते. रिचर्ड कॉबडेन व जॉन ब्राईट यांनी केलेल्या मुक्त व्यापाराच्या जोरदार समर्थनामुळे इंग्लंडने ही नीती स्वीकारली. त्यामुळे कच्च्या मालाची व अन्नधान्याची आयात स्वस्त होऊन तसेच निर्मिती मालाची निर्यात वाढून इंग्लंडच्या विदेशी व्यापाराची बरीच भरभराट झाली. मुक्त व्यापारनीति भारताला हितावह नसताना इंग्लंडच्या दबावामुळे आपल्यालाही याच नीतीवर चालणे भाग पडले.
 मुक्त व्यापार हे मालाच्या आंतरराष्ट्रीय देव-घेवीचे नैसर्गिक तत्त्व आहे. राजकीय सीमा हे वस्तुतः आर्थिक क्षेत्रावर लावण्यात आलेले कृत्रिम बंधन असल्यामुळे त्या अनुरोधाने व्यापारांत अडथळे निर्माण होता कामा नयेत. यामुळे मालाविषयी देशी किंवा विदेशी या विशेषणांचा उपयोग करणे हे कृत्रिमपणाचे द्योतक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मुक्त व्यापाराचे स्वरूप मुळात अंतर्गत व्यापारासारखेच आहे. त्यामुळे देशा-देशांतील व्यापार मुक्त असला तर त्यापासून अंतर्गत व्यापाराचे सर्व लाभ प्राप्त होतील. उत्पादनाच्या घटकांचे त्यामुळे सर्वोत्कृष्ट विशेष उपयोजन होऊ शकेल, असे मत मांडले गेले.
 वरील सर्व विचार हे रणदिवे, रोसेन बर्ग, कॉल, वेस्ट आणि कोस्ट्स यांनी अधिक स्पष्ट केले आहेत. शुम्पीटर आणि मिक यांनी स्मिथच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेच्या विचारांना 'द्विदलतावाद' असे नाव दिले. कारण त्यात स्वतंत्र व्यापार व अल्प प्रमाणात सरकारी हस्तक्षेपाचा उल्लेख आहे. मूल्य,वितरण, व त्यांच्याच क्षेत्रांचा सखोल अभ्यास (ज्याला निरंकुश धोरणाबरोबर जोडलेले आहे.) कोट्स, डगलस, कॉशल, रॉबर्टसन आणि टेलर यांनी केला. स्मिथच्या अभ्यासक्रमांत झालेल्या अधिक्य मूल्याचे विवेचन स्पर्धात्मक भांडवलशाही अर्थव्यवस्थेकरिता अतिशय उपयुक्त आहे. त्याला एल्सनर, सोबेल, रोसेनबर्ग

यांनी उदारमतवाद आणि बाजारव्यवस्थेच्या दृष्टीने उपयोगी भांडवल व संस्थात्मक विकासाचा मुख्य आधार म्हणून अध्ययन केले.

अर्थाच्या अवती-भवती । ११